अमेरिकेच्या धमकीचा परिणाम,सौदीकडून हिंदुस्थानला मिळणार 40 लाख बॅरल जादा तेल


सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी तेल उत्पादन वाढविण्याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला थेट धमकीच दिली. या धमकीचा परिणाम झाला असून सौदीकडून तेलाचे अतिरिक्त उत्पादन केले जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये सौदी अरेबियाकडून हिंदुस्थानला 40 लाख बॅरल अतिरिक्त तेल मिळण्याची शक्यता आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे हिंदुस्थानात पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यात इराणवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. इराणकडून तेल खरेदी करू नये असा दबाव अमेरिकेकडून टाकण्यात येत आहे.

किमती कमी करण्यासाठी सौदीवर दबाव

अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या निर्बंधांचा परिणाम म्हणून तेलाच्या किमती 100 डॉलर्स प्रतिबॅरलवर जाण्याची  शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला किमती कमी करण्यासाठी धमकी दिली आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय सौदीचे शाह सलमान बिन अब्दुल अझीझ अल-सौद हे दोन आठवडेसुद्धा पदावर राहू शकणार नाहीत असा दम ट्रम्प यांनी दिल्याचे वृत्त आहे. या धमकीनंतर सौदी अरेबियाकडून नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानला 40 लाख बॅरल जादा तेल मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गेल्या आठवडय़ात हिंदुस्थाननेही सौदी अरेबियाला तेलाच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती.

trump-1

अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय सौदी अरेबियाचे शाह दोन आठवडेसुद्धा पदावर राहू शकणार नाहीत!-राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

इराणकडून तेल आयात नाही

अमेरिकेच्या निर्बंधामुळे नोव्हेंबरपासून इराणकडून तेल आयात केले जाणार नाही असे संकेत हिंदुस्थानातील तेल कंपन्यांनी दिले आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, रिलायन्स, मंगलोर रिफायनरी या कंपन्यांनी सौदी अरेबियाकडे अतिरिक्त तेलाची मागणी केल्याचे वृत्त आहे.