सौदी अरेबियाची लेडी रोबो शनिवारी आयआयटीत

 

सामना प्रतिनिधी । मुंबई

 माणसाप्रमाणे काम करणारा, बोलणारा रोबोट एखाद्या देशाचा नागरिक असू शकतो, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. सौदी अरेबियाने ‘सोफिया’ या लेडी रोबोला नागरिकत्व बहाल केले आहे. तुम्हाला जर सोफियाला भेटण्याची इच्छा असेल तर येत्या शनिवारी ३० डिसेंबरला आयआयटी, पवईमध्ये नक्कीच हजेरी लावा. आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ सध्या सुरू असून शनिवारी दिवसभर सोफिया आयआयटी कॅम्पसमध्ये वावरताना दिसणार आहे.

सोफिया रोबोटला तुम्ही तुमच्या मनातील कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचा प्रश्न टेकफेस्टची टीम सोफियासमोर ठेकणार आहे. सोफियाला प्रश्न विचारण्यासाठी टेकफेस्टने ट्विटर कॅम्पेन सुरू केले असून युजर्स ट्विटरवर ‘#AskSophia’ वर प्रश्न पाठवू शकतात, अशी माहिती टेकफेस्टचा प्रसिद्धीप्रमुख अनिरुद्ध पोदार याने दिली. आयआयटीच्या दीक्षान्त सभागृहात सोफिया उपस्थितांसोबत संवाद साधणार आहे. सोफिया एक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली रोबोट असून डॉ. डेव्हिड हॅन्सन यांनी तिची निर्मिती केली आहे. सोफियाव्यतिरिक्त यंदा टेकफेस्टमध्ये सर्वात तरुण आयबीएम विकासक तन्मय बक्षी, यूआयडीआयचे चेअरमन जे. सत्यनारायणन यांच्याशीदेखील विद्यार्थ्यांना संवाद साधता येणार आहे.

अशी आहे ‘सोफिया’…

– सोफियाची शरीरयष्टी नाजूक असून डोळ्यांची रचना खूपच बोलकी आहे. प्रकाशामध्ये तिच्या डोळ्यांचा रंग बदलतो.

– कॅमेरा आणि ‘एआय’ सॉफ्टवेअरमुळे एकदा पाहिलेला चेहरा तिचे डोळे पुढे कधीही विसरू शकत नाही.

– युजर्स सोफियाला हवामान, वाहतूक कोंडीविषयीचे प्रश्नदेखील विचारू शकतात.

– आवाजाची ओळख ठेवण्याची क्षमता असल्याने सोफिया लोकांशी अधिक चांगला संवाद साधू शकते.