सौराष्ट्राचा विक्रमी विजय;  उत्तर प्रदेशला हरवत उपांत्य फेरीत धडक

1

सामना ऑनलाईन । लखनौ

हार्विक देसाईने दोन्ही डावांत केलेली दमदार फलंदाजी… धमेंद्र जाडेजा, जयदेव उनाडकट यांनी दोन्ही डावांत केलेली प्रभावी गोलंदाजी… अन् चेतेश्वर पुजारा व शेल्डॉन जॅक्सन यांनी चौथ्या डावांत झळकावलेल्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर सौराष्ट्राने येथे झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उत्तर प्रदेशला सहा गडी राखून पराभूत केले आणि ऐतिहासिक कामगिरीसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. रणजी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात सर्वोच्च धावसंख्या करण्यात सौराष्ट्राला यश लाभले. सौराष्ट्रासमोर उपांत्य फेरीत आता कर्नाटकचे आव्हान असेल.

372 धावांचा पाठलाग करताना हार्विक देसाईने 16 चौकारांसह 116 धावांची दमदार खेळी साकारली. स्नेल पटेलने 72 धावा करीत त्याला उत्तम साथ दिली. सौराष्ट्राची अवस्था 4 बाद 236 धावा असताना चेतेश्वर पुजारा व शेल्डॉन जॅक्सन या जोडीने 136 धावांची अभेद्य भागीदारी करीत सौराष्ट्राच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. चेतेश्वर पुजाराने 9 चौकारांसह नाबाद 67 धावांची आणि शेल्डॉन जॅक्सनने 1 षटकार व 11 चौकारांसह नाबाद 73 धावांची खेळी केली.