थोडा विचार त्यांचाही…

योगेश नगरदेवळेकर

एकटय़ा संक्रांतीच्या दिवशी शेकडो पक्षी पतंगीच्या मांजाने जखमी होतात.

संक्रांत जशी तीळगूळसाठी प्रसिद्ध आहे तशीच पतंगबाजीसाठी पण. हिंदुस्थानभर संक्रातीला पतंग उडविण्यास सुरुवात होते. घरात ठेवलेले फिरकी, मांजा, पतंग बाहेर निघतात आणि आकाशात विहार करायला लागतात. आपल्या या आनंदाचा खेळ मात्र पक्ष्यांच्या जीवावर बेततो.

एकटय़ा संक्रांतीच्या दिवशी शेकडो पक्षी पतंगीच्या मांजाने जखमी होतात. आकाशात उडणाऱया पतंगाचा मांजा त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग पंखांना किंवा गळय़ाला मांजा अडकून पक्षी जखमी होतात. एकदा का पंख जायबंदी झाला की पक्ष्याच्या उडण्यावर तसेच अन्न शोधण्यावर बंधन येते. लगेच जरी त्याचा मृत्यू झाला नाही तरी उपासमारीने हळूहळू पक्षी मरणाकडे ढकलला जातो. काही पक्षी तर झाडावर अडकलेल्या मांजामध्ये गुरफटून जातात आणि मग कावळय़ासारखे पक्षी त्याला टोचून मारून टाकतात.

पतंग उडविण्याबाबत काही अडचण नाहीए. यातला मुख्य आरोपी आहे तो न तुटणारा बारीक नायलॉन मांजा किंवा काचेची पुटं लावून तयार केलेला काचमांजा. मांजा म्हणून साधा धागा वापरल्यास तो सहज तुटतो म्हणून पतंगप्रेमी वजनाला हलका, सहजी न तुटणारा असा नॉयलॉनचा किंवा चायनीज मांजा वापरतात. हाच मांजा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. उडताना तर जखमी होतातच पण हा मांजा सहजी तुटत नसल्याने किंवा ऊनपावसाने खराब होत नसल्याने वर्षभर तसाच लटकत राहतो. यात वर्षभर अनेक पक्षी अडकून जायबंदी होतात.

खरे तर चायनीज मांजावर बंदी आहे पण तो स्वस्त आणि टिकाऊ म्हणून वापरला जातो. आपण पतंग उडविण्याचा आनंद घेऊया पण त्यासाठी साध्या दोऱयाचा आग्रह धरून, जेणेकरून आपला आनंद पक्ष्यांसाठी दुःखद काळ न ठरो.