सविता दामोदर परांजपेचा थरारक ट्रेलर पाहिलात का?

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपट हे त्याच्या सशक्त कथानक आणि आशयघन कलाविष्कारांसाठी ओळखला जातो. या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. जॉन अब्राहम निर्मित आणि स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित सविता दामोदर परांजपे हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला असून त्यावरून हा चित्रपट थरारक असणार आहे, हे स्पष्ट होत आहे.

१९८५ साली आलेलं शेखर ताम्हाणे लिखित सविता दामोदर परांजपे या नाटकाचं हे चित्ररूप आहे. शरद आणि कुसुम अभ्यंकर या जोडप्याच्या आयुष्यात आलेलं वादळ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. मूळ नाटकावरून प्रेरित असल्याने या चित्रपटाचा काळही ८०च्या दशकातला आहे. या चित्रपटाचा वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल ही या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

तृप्ती या चित्रपटात सविता या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे आणि राकेश बापटही मुख्य भूमिका साकारणार आहेत. मूळ नाटकात सविताची भूमिका दिवंगत अभिनेत्री रीमा यांनी साकारली होती. त्यामुळे चित्रपट रुपात येताना त्याच ताकदीचा अभिनय करणं हे मोठं आव्हान तृप्ती हिच्यासमोर असणार आहे. हा चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

trailer of upcoming movie savita damodar paranjpe has released. trailer contains thrill and mystery.