‘सवाई भीमसेन संगीत संमेलन’ यंदा मुंबईत

सामना ऑनलाईन । मुंबई

दरवर्षी पुणेकर संगीत रसिकांसाठी पर्वणी ठरणारे ‘सवाई भीमसेन संगीत संमेलन’ यंदा पहिल्यांदाच मुंबई भरणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबई रसिक श्रोत्यांना या संमेलनाच्या निमित्ताने सप्तसुरांची मेजवानीच अनुभवता येणार आहे. रविवार, १८ मार्च रोजी सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये हे संमेलन रंगणार आहे.

मुंबईत प्रथमच होणाऱ्या या संगीत संमेलनामध्ये संगीत रसिकांना डॉ. प्रभा अत्रे, शंकर महादेवन, भुवनेश कोमकली, श्रीनिवास जोशी, विराज जोशी, पं. सुरेश तळवलकर, अंबी सुब्रमण्यम, प. उल्हास कशाळकर, सावनी दातार आणि शिल्पा पुणतांबेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या सुमधुर गायनाचा आनंद लुटता येणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ अशी पूर्ण दिवस ही शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल रंगणार आहे.

‘सवाई भीमसेन संगीत संमेलन २०१८’ या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन मॅजिक आय प्रा. लि. तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना इंडियन मॅजिक आय प्रा. लि. चे प्रमुख तसेच सिनेनिर्माते श्रीरंग गोडबोले यांनी सांगितले, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना वंदन करून सवाईचे प्रथमच मुंबईत पदार्पण होत आहे. ‘सवाई भीमसेन संगीत संमेलन २०१८’ च्या निमित्ताने भारतरत्न भीमसेन जोशी यांनी त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने पुण्यात सुरू केलेल्या ‘सवाई गंधर्व’ महोत्सवाच्या धर्तीवर संगीत महोत्सवाची ही सुवर्ण परंपरा प्रथमच मुंबईकरांसाठी घेऊन येत आहे. हा कार्यक्रम म्हणजे भीमसेन जोशी यांच्या २०२२ मधील जन्मशताब्दी सोहळ्याची नांदी ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या प्रवेशिका Bookmyshow वर उपलब्ध असून रविवार, ११ मार्चपासून षण्मुखानंद सभागृह येथेही मिळणार आहेत.