कानसेनांसाठी आनंदपर्वणी

18

मेधा पालकर । पुणे

पुण्यातल्या रमणबाग प्रशालेच्या मैदानावर भव्य मंडपात १३ डिसेंबरपासून सवाई गंधर्व महोत्सव साजरा होतोय… अशा लोकप्रिय महोत्सवाविषयी थोडेसे…

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणजे जगभरातील अभिजात संगीताची गोडी असणाऱया कानसेनांसाठी आनंदपर्वणीच. दरवर्षी डिसेंबर महिन्यात येणाऱया संगीत महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पहात असतात. यंदाच्यावर्षी हा महोत्सव पाच दिवस होतोय. या कालावधीत अनेक दिग्गज, बुजुर्ग कलावंतांबरोबरच नव्या पिढीतील कलाकारांचा अविष्कार एकाच ठिकाणी पाहाण्याची संधी सहसा रसिक चुकवत नाहीत. पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. जसराज यांची संगीत मैफल ऐकण्यासाठी राज्याच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱयातून रसिक येतात.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व महोत्सवाची सुरूवात केली आणि गुरूभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण समोर ठेवले. देशाच्या विविध प्रातांतील आणि भाषेतील कलाकारांचा संगम एकाच मंचावर घडला. नवोदित कलाकारांना भीमसेन जोशी यांनी व्यासपीठ मिळवून दिले. आजही अनेक दिग्गज कलाकार कला सवाईत सादर करण्याची मनीषा बाळगून असतात. ज्यांना ही संधी मिळते तो त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळेच सवाई महोत्सवाला संगीताची पंढरी म्हटले जाते. महोत्सवाचे हे ६५वे वर्ष आहे.

दिग्गजांची मुलाखत
महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱया षड्ज आणि अंतरंग कार्यक्रमामध्ये दिग्गज कलावंतांवरील लघूपट आणि त्यांच्याशी मुलाखतीचा कार्यक्रम होतो. जयपूर अत्रौली, किरणा, बनारस, पतियाळा घराण्याच्या घरंदाज गायिकीचे अनोखे दर्शन महोत्सवात कला सादर करणारे कलावंत करून देतात. त्यामुळे सवाई महोत्सव कधी येतो अशी अवस्था रसिकांची झालेली असते. शाळकरी विद्यार्थ्यांसाठीही सवलतीच्या दरात तिकीट असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही संगीताची गोडी लागावी यासाठी पुण्यातल्या काही शाळा यामध्ये पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना हा महोत्सव ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतात. सवाई महोत्सवाची ७०च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. पाच दिवसाच्या सत्रामध्ये प्रत्येक कलावंताला आपली कला सादर करण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी मिळतो. पूर्वी हीच मैफल तासन् तास चालत असे. पण सध्या वेळेचे बंधन असल्याने कमी कालावधीत जास्त कलावंतांचा अविष्कार रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आर्य संगीत प्रसारक मंडळ प्रयत्नशील असते. महोत्सवाच्यानिमित्ताने संगीतातील मान्यवरांची ओळख करून देणारे छायाचित्र प्रदर्शनही भरविण्यात येते. यंदाही तंतूवाद्य वादकांची ओळख ‘ग्लोरी ऑफ स्ट्रिंग्ज’ प्रदर्शनातून रसिकांना होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या