टेरर फंडिंग प्रकरण, एनआयएकडून शाहीद अटकेत

सामना ऑनलाईन । श्रीनगर

हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीनचा मुलगा शाहीद यूसुफ याला टेरर फंडिंग प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. टेरर फंडिंग प्रकरणातील ही एनआयएची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. शाहीद यूसुफ हा जम्मू-कश्मीर सरकारमधील कृषी विभागात ज्युनिअर इंजिनिअर पदावर आहे. बुधवारी त्याला दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सय्यद सलाऊद्दीनने दोन लग्न केली होती. त्याची एक पत्नी हिंदुस्थानात तर दुसरी पत्नी पाकिस्तानात राहते. शाहीद यूसुफ हा सय्यद सलाऊद्दीनच्या हिंदुस्थानातील पत्नीचा मुलगा आहे. शाहीदला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानात पुरस्कृत दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शाहीद परदेशातून फंड जमा करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दरम्यान, आतापर्यंत टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने अनेक फुटिरतावादी नेते, जम्मू-कश्मीरमधील व्यावसायिक व अपक्ष आमदार यांना अटक केली आहे.