बचत खात्याच्या किमान रकमेतून एसबीआयने कमवले १७७१ कोटी

सामना ऑनलाईन । मुंबई

सगळय़ात मोठी आणि सगळय़ात जास्त ग्राहकसंख्या असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यात किमान पैसे ठेवण्याचा नियम भंग करणाऱया ग्राहकांकडून केलेल्या दंडवसुलीतून १७७१ कोटी कमवले आहे. विशेष म्हणजे ही रक्कम ‘एसबीआय’च्या तिमाही निव्वळ नफ्यापेक्षा जास्त आहे. जुलै ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत एसबीआयचा निव्वळ नफा हा १५८१ कोटी इतका होता.

नोटाबंदी झाल्यानंतर लगेच एसबीआयने ग्राहकांना बचत खात्यात किमान ५ हजार रुपये ठेवले पाहिजे. त्यापेक्षा कमी पैसे असतील तर अशा ग्राहकांकडून दंड वसूल केला जाईल, असे म्हटले होते. मात्र, एसबीआयच्या या निर्णयावर सर्वत्र थरातून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर बचत खात्यातील किमान रकमेची मर्यादा ३ हजार करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱया खात्यातून दंडाची रक्कम परस्पर वसूल केली जाते. निवृत्तीवेतन घेणाऱया व्यक्ती आणि 18 वर्षांखालील मुलांच्या खात्यांना या नियमातून वगळण्यात आले आहे.

– किमान रक्कम ठेवण्याच्या अटीपासून मुक्तता मिळवण्यासाठी एसबीआयने ग्राहकांसमोर इतर पर्यायही ठेवले आहेत. बेसिक सेव्हिंग डिपॉझिट अकाऊंट, जनधन खाते, छोटी बचत खाती आणि पगारी खात्यातून यांना वगळण्यात आले आहे.