किमान बॅलन्सच्या शुल्कातून एसबीआयने वसूल केले १७७१ कोटी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्टेट बँक ऑफ इंडियाने खात्यात किमान बॅलन्स न राखणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क म्हणून १७७१ कोटी रुपये वसूल केले आहेत. विशेष म्हणजे शुल्काची ही रक्कम एसबीआयच्या दुसऱ्या तिमाहीच्या निव्वळ नफ्याहून जास्त आहे. २०१७च्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीतला एसबीआयचा निव्वळ नफा १५८१ कोटी इतका होता. २०१७च्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतील ही आकडेवारी अर्थमंत्रालयाने जाहीर केली आहे.

साल २०१६-१७ मध्ये एसबीआयने ही शुल्कवसुली लागू केली नव्हती. मात्र, २०१७ पासून ती लागू करण्यात आली. एसबीआयच्या मेट्रो आणि शहर क्षेत्रांमधील बचत खात्यांमध्ये किमान रक्कम न ठेवल्यास बँक शुल्क वसूल करते. यापूर्वी हे शुल्क ५ हजार इतकं होतं. ते घटवण्यात येऊन ३ हजार रुपये झालं. अर्थात निवृत्तीवेतन खाती, १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांची खाती इत्यादींना या अटीतून सूट देण्यात आली आहे.

किमान रक्कम ठेवण्याच्या अटीपासून मुक्तता मिळवण्यासाठी एसबीआय ग्राहकांना इतर खात्यांचे पर्यायही उपलब्ध करून देत आहे. बेसिक सेव्हिंग्ज डिपॉझिट अकाउंट, जनधन खाते, छोटी बचत खाती किंवा पगारी खात्यांवर किमान रकमेची अट लागू होत नाही.