स्टेट बँक ऑफ इंडिया ‘देशभक्त’ ब्रॅण्ड

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) देशातील सर्वात मोठा देशभक्ती ब्रॅण्ड म्हणून निवड झाली आहे. टाटा मोटर्स, पतंजली, रिलायन्स जियो आणि बीएसएनएलला मागे टाकत एसबीआयने हे स्थान पटकावले आहे.

युकेतील युगव या ऑनलाइन मार्केट रिसर्च ऍण्ड डाटा ऍनालटिक्स कंपनीने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये एकूण 152 ब्रॅण्ड सहभागी झाले होते. 2 ते 8 ऑगस्टदरम्यान झालेल्या या सर्व्हेमध्ये एकूण 1 हजार 193 लोकांनी भाग घेतला होता. यातील 47 टक्के लोकांनी एसबीआयला पसंती दिली. नागरिकांनी आर्थिक क्षेत्राला सर्वाधिक मतदान केले आहे. एसबीआयबरोबरच लाइफ इंश्योरेन्स कॉर्पोरेशनला सर्वाधिक मते मिळाली आहेत. आर्थिक क्षेत्रानंतर ऑटो, कन्झुमर गुड्स, अन्नपदार्थ, टोलिकॉम या क्षेत्राचा समावेश आहे.

पदार्थांमध्ये अमूल ब्रॅण्ड नंबर एक

पदार्थांमध्ये अमूल हा ब्रॅण्ड नंबर एक आहे. तर रामदेव बाबांच्या पतंजलीने दुसरे स्थान मिळविले आहे. सौंदर्याची काळजी घेणारा ब्रॅण्ड म्हणून पतंजली सर्वात पुढे आहे. पतंजलीने डाबर आणि विकोला मागे टाकले आहे. तर टेलिकॉम क्षेत्रात बीएसएनएलला 41 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.

लोकांची पसंती यांना…

आर्थिक क्षेत्रात एसबीआय 47 टक्के, एलआयसी 16 टक्के तर ऑटो क्षेत्रात टाटा मोटर्स 30 टक्के, भारत पेट्रोलियम 13 टक्के आणि मारुती सुझुकी 11 टक्के अशी आहे.