देशभरात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशभरात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. एखाद्या राज्यात गोहत्या बंदी लागू करण्यात येऊ शकते. मात्र दुसरे राज्यही त्यास तयार होईलच असे नाही. यामुळे आम्ही राज्यातील कायद्यांमध्ये हस्तक्षेप करणार नाही अशी रोखठोक भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने देशभरात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

गाय ही हिंदूची देवता आहे. यामुळे देशभरात होणा-या गायींच्या कत्तली थांबवण्यासाठी गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात यावा अशी याचिका विनित साही या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावरील सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी कायदा लागु करण्यास नकार दिला. तसेच यावेळी जनावरांची इतर राज्यांमध्ये बेकायदेशीरपणे वाहतूक करण्यावर आधीच बंदी घालण्याचे आदेश दिल्याचे न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या निदर्शनास आणून दिले.