राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

1

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

‘चौकीदार चोर हैं’ हे सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे, हे वक्तव्य राहुल गांधी यांच्या चांगले अंगलट आले असून न्यायालयाने त्यांना याप्रकरणी अवमान नोटीस बजावली आहे. यासंदर्भात भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 30 एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार आहे.

राफेल विमाने खरेदीप्रकरणी फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी फेटाळून लावत नव्या सादर करण्यात आलेली कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर हैं’ हे न्यायालयाला मान्य असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर आक्षेप घेत भाजपने दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावत संदर्भासह स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते.
प्रतिज्ञापत्राद्वारे या नोटिसीला दिलेल्या उत्तरात राजकीय प्रचाराच्या ओघात चुकीचे वक्तव्य आपल्याकडून झाले, असा माफीनामा न्यायालयात सादर करत दिलगिरी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान भाजपच्या मीनाक्षी लेखी यांचे वकील ऍड. मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडताना राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य चुकीचे असल्याचे मान्य केले आहे. मात्र याबाबत एका वाक्यात खेद व्यक्त करत दिलगिरी व्यक्त करणे म्हणजे केवळ दिखाऊपणा असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

राहुल गांधी यांच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ते नम्र आणि प्रामाणिक आहेत. त्यांच्या विरोधातील याचिका रद्द करण्याची विनंती केली. मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ती फेटाळून लावत राहुल यांना अवमान नोटीस बजावली आहे.

चौकीदार चोर है, हे न्यायालयालाही मान्य असल्याच्या राहुल गांधी याच्या वक्तव्याबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुणावणी झाली. यावेळी न्यायालयाने चौकीदार कोण आहे, असा सवाल केला.

त्यावर भाजपची बाजू मांडताना वकील मुकुल रोहतगी यानी चौकीदार नरेंद्र मोदी आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या विरोधात अमेठीपासून वायनाडपर्यंत न्यायालयानं चौकीदार चोर असल्याच मान्य केल्याचा अपप्रचार केला असल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांची बाजू न्यायालयासोर मांडताना काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ‘चौकीदार चोर है’ या घोषणेवर राहुल गांधी ठाम आहेत. न्यायालयाच्या हवाला देत यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केल्याने भाजपची अवमान याचिका रद्द करण्याची विनंती केली.