६०० पेक्षा जास्त लोकांना फसवणाऱ्या नवराबायकोला अटक

सामना ऑनलाईन,संभाजीनगर

अल्प भांडवलाय उद्योग सुरू करण्याचं आमीष दाखवत सहाशेपेक्षा अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या नवराबायकोला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. हे जोडपं २ महिन्यांपासून फरार होतं. त्यांना छत्तीसगडमधून अटक करण्यात आली आहे. प्रशिक आणि नेहा बनसोड असं या दोघांचे नाव आहे.

या दोघांनी मिळून ग्लोबल गृहउद्योग नावाची बोगस कंपनी सुरू केली. या कंपनीद्वारे मेणबत्ती बनवण्याचा गृहउद्योग सुरू करा अशी जाहिरात करण्यात आली. यासाठी ग्राहकाने काही ठराविक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करावी, त्यानंतर कंपनीतर्फे कच्चा माल देण्यात येईल आणि बनवलेल्या मेणबत्त्याही कंपनीच विकत घेईल असं ग्राहकांना सांगण्यात आलं. त्यानुसार कंपनीमध्ये ग्राहकांनी अनामत रक्कम जमा केली,कंपनीने सुरूवातीला त्यांना कच्चा मालही दिला मात्र नंतर कंपनी बंद करून बनसोड कुटुंब फरार झालं. या दोघांनी २ कोटी रूपयांना गंडा घातल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस सध्या या दोघांची चौकशी करत आहे.