मुलासोबत मैत्री केल्यामुळे शिक्षक ओरडले, विद्यार्थिनीने मारली दुसऱ्या मजल्यावरून उडी

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

अंबरनाथमधील शाळेत एका विद्यार्थिनीने मुलासोबत मैत्री केल्यावरून शिक्षकांनी ओरडल्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचे उघड झाले आहे. या विद्यार्थिनीने सुरुवातीला पाय घसरून पडल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र आता तिने शाळेतील तीन शिक्षकांवर तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप केल्याने आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या विद्यार्थीनीचे समुपदेशन सुरू असताना तिने डॉक्टरांना ही माहिती दिली आहे. याप्रकरणी शाळेने या शिक्षकांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केले आहे.

या विद्यार्थिनेने समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरला दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी ती गणित विषयाचा एक प्रश्न विचारण्यासाठी गणिताच्या शिक्षीकेला भेटायाला गेली होती. मात्र शिक्षीकेने तिला नंतर येण्यास सांगितले. काही वेळाने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या तिच्या एका मित्राने तिला गणिताच्या शिक्षीका बोलावत असल्याचा निरोप दिला. ती जेव्हा त्यांना भेटायला गेली तेव्हा त्यांनी थेट तिला त्या मुलावरून ओरडायला सुरुवात केली व हे असले चाळे शाळेत चालणार नाहीत, असा दमही भरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील तिच्या वर्गशिक्षीकेने तिला यावरून ओरडली व त्या दोघांत काय सुरू असल्याचे विचारले. त्यावेळी तिने ते फक्त चांगले मित्र असल्याचे वर्ग शिक्षीकेला सांगितले मात्र त्या शिक्षीकेने तिला बोलू दिले नाही. काही वेळाने तीन शिक्षकांनी तिला वर्गाबाहेर बोलावले व तिला त्या मुलासोबतच्या मैत्रीवरून ओरडायला लागले. त्यांनी तिच्या पालकांना देखील शाळेत बोलवणार असल्याचे तिला सांगितले. हे सर्व प्रकरण पालकांना कळले तर त्यांना वाईट वाटेल या भीतीने ती दुसऱ्या मजल्यावर गेली व तेथून तिने खाली उडी मारली.

याप्रकरणात शाळेच्या मुख्यध्यापकांनी मात्र शिक्षकांची बाजू घेतली आहे. जर एखादा विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला ओरडणे हा गुन्हा आहे का? असा सवाल या शाळेच्या मुख्याध्यापकांनी केला आहे. “ती विद्यार्थीने शाळा बुडवत होती. मुला व मुलींमधील नाते आम्हालाही मान्य आहेत. पण हे सर्व करण्याला एक वेळ असते. जर शिक्षकांनी त्या विद्यार्थीनीला हे सर्व समजावले असेल तर त्यात त्यांचे काय चुकले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या आचरणावर लक्ष देणं हे शिक्षकांचे कामच आहे. आणि त्यासाठी कधीतरी शिक्षकांना त्यांना ओरडावे लागते. या विद्यार्थीनीला शिक्षकांच्या ओरडण्यामुळे स्वत:चा अपमान झाल्यासारखे वाटले, त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले असावे, असे शाळेच्या मुख्यध्यापकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

याप्रकरणी अद्याप मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केलेली नाही त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू केलेला नाही. जर त्यांनी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली तर आम्ही तपासाला सुरूवात करू, असे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. बी. कावते यांनी सांगितले.