कमलनाथ यांना डाकू म्हणणारा शिक्षक निलंबित


सामना ऑनलाईन, जबलपूर

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांना डाकू म्हणणाऱ्या मुख्याध्यापकाविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले असून या मुख्याध्यापकाविरूद्ध चौकशीचेही आदेश देण्यात आले आहे. चौकशी अहवाल येईपर्यंत मुख्याध्यापकाची बदली जिल्हा शिक्षण कार्यालयात करण्यात आली आहे.

जबलपूरमधल्या एका शाळेमधला हा प्रकार आहे. इथले मुख्याध्यापक मुकेश तिवारी यांनी शिवराजसिंह चौहान आमचे आहेत आणि कमलनाथ डाकू आहेत असं विधान केलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतापले. त्यांनी जिल्हाधिकारी छवी भारद्वाज यांची भेट घेतली आणि तिवारी यांच्यावर कारवाईची मागणी केली. या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब तिवारी यांचं निलंबन केलं.