विक्रोळीच्या शाळेतील लंपट शिपायाला अटक

सामना प्रतिनिधी, मुंबई

शाळेतील लेडीज टॉयलेटमध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनींचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या लंपट शिपायाला विक्रोळी पोलिसांनी अटक केली. विजय शिवतरे (२९) असे त्याचे नाव आहे.

पार्क साइटला राहणारा विजय चार वर्षांपासून या शाळेत कामाला होता. बुधवारी दुपारी एक विद्यार्थिनी टॉयलेटमध्ये गेली असता तिला मोबाईलच्या व्हायबेशनचा आवाज येऊन अंगावर माती पडली. त्यामुळे तिने वर भिंतीवर पाहिले असता एक मोबाईल तिला दिसला. तिने हा प्रकार शिक्षिकेला सांगितला.

शाळेने तक्रार केल्यानंतर विजयला ‘३५४ क’ व आयटी ऍक्टनुसार पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह असे काही आढळले नसल्याचे विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर हंचाटे यांनी सांगितले.