दुबईत मार्स सायन्स सिटी

मंगळ ग्रहाचे पृथ्वीवासीयांना कायमच आकर्षण वाटत आले आहे. त्या ग्रहाबद्दलची गूढता, त्यावर जीवसृष्टी असल्याच्या चर्चा अशा अनेक कारणांनी हा ग्रह कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. आता दुबईमध्ये तर चक्क मार्स सायन्स सिटी नावाने मंगळ ग्रहाच्या तंतोतंत वातावरणाने भरलेले असे शहर उभारायचा घाट घातला आहे. इथले वातावरण तर मंगळ ग्रहाप्रमाणे असेलच, पण इथल्या रहिवाशांना मंगळ ग्रहावरती जगण्यास आवश्यक अशा अन्नपदार्थ, पाणी, ऊर्जा यांचादेखील अनुभव घ्यावा लागणार आहे. पुढील शंभर वर्षांत मानवी वस्ती मंगळावर हालवायचे उद्दिष्ट दुबईने ठेवले आहे आणि ही मार्स सायन्स सिटी त्याच उद्देशाचा एक भाग आहे. ब्रह्मांडातील अस्तित्वात असलेल्या कुठल्याही रचनेची ही सर्वात मोठी कॉपी असणार आहे. १३५० मिलियन डॉलर्स खर्चाचे हे शहर एक लाख वर्ग फूट परिसरात पसरलेले असेल. संयुक्त अरब अमिरातीच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये याची घोषणा करण्यात आली. भविष्यातील पर्यावरण आणि भविष्यातील इतर मानवी समस्या यांचा अभ्यास करून या शहराची निर्मिती केली जाणार असल्याचे या शहराच्या डिझायनर्सनी नमूद केले आहे. इथली जमीन ही मंगळ ग्रहावरील जमिनीला अनुसरून अशी कठोर बनवली जाईल तसेच मंगळावरील वातावरणाचा देखील अभ्यास यावेळी करण्यात येईल. या शहरात एक भव्य संग्रहालयदेखील असणार आहे, जिथे मानवाने अंतराळात केलेल्या प्रगतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. या संग्रहालयाच्या भिंतींना थ्री-डी प्रिंटरच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे. दुबईच्या ‘मंगळ २११७’ या प्रोजेक्टचा हिस्सा असणाऱया या शहरात हुबेहूब मंगळ या लाल ग्रहाचे वातावरण तयार केले जाणार आहे. एका बाजूला मंगळावर मानव पाठवण्याचे प्रयत्न होत असताना एकीकडे याची तयारी म्हणून चक्क मंगळ ग्रहालाच जणू पृथ्वीवरती आणले जात आहे.