विज्ञानकथा की प्रवासवर्णन?


महाराष्ट्राचे प्रख्यात आणि लोकप्रिय नाटककार वसंतराव कानेटकर हे मुळात उत्कृष्ट कादंबरीकार, कथाकार आणि कवीसुद्धा होते. पण साहित्याचे हे सगळे प्रकार हाताळत असताना त्यांना यशस्वी नाटकाचा फॉर्म्युला सापडला. त्यामुळे ते नाटक याच साहित्यप्रकारात इतके तल्लीन होऊन गेले की, ‘आत्मचरित्रसुद्धा मी नाटकाच्याच ‘फॉर्म’मध्ये लिहीन’, असे उद्गार त्यांनी एका मुलाखतीत काढले होते. प्रस्तुत ‘ना पूर्व ना पश्चिम’ या प्रवासवर्णनात डॉ. बाळ फोंडके यांनी जाणीवपूर्वक असाच प्रयोग केला आहे. बाळ फोंडके हे स्वतः नामवंत वैज्ञानिक आणि तितकेच नामवंत विज्ञानकथा लेखकही आहेत. मराठीत आणि इंग्रजीतली त्यांची आतापर्यंत ६५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

प्रवासवर्णन हा मराठी साहित्यातला एक लोकप्रिय वाङ्मय प्रकार आहे. १८५७ च्या क्रांतीयुद्धाच्या काळातले ‘माझा प्रवास’ हे वरसईकर गोडसे भटजींचे प्रवासवर्णन ते सध्याची मीना प्रभूंची जगभरच्या वेगवेगळ्या देशांमधल्या सफरींची वर्णने लोक आवडीने वाचत असतात. मात्र वेगवेगळ्या देशांमधल्या वैज्ञानिक प्रगतीचा आढावा कुणी जाणतेपणाने घेतलाय आणि तो सोप्या भाषेत वाचकांसमोर ठेवलाय असे फारसे आढळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडचे बहुतेक ललित साहित्य लेखक किंवा लेखिका यांना विज्ञानात फारसे स्वारस्य नसते. डॉ. बाळ फोंडके यांनी नेमका हाच मुद्दा पकडून प्रस्तुत प्रवासवर्णन लिहिले आहे. यात फक्त विदेशप्रवासच आहेत असे नाही.

आपल्या देशातल्याही काही अलौकिक आश्चर्यांचा वैज्ञानिक शोध घेण्याचा प्रयत्न आहे. उदा. आतापर्यंत प्राचीन मानवाने गुंफांमध्ये काढलेली भित्तीचित्रे सर्वाधिक प्राचीन कोणती तर फ्रान्समधली असे समजले जात असे. पण आपल्या देशातल्या डॉ. वि. श्री. वाकणकर नावाच्या महान पुरातत्त्वशास्त्रज्ञाने भोपाळजवळ भीमबेटका या ठिकाणी त्याहीपेक्षा प्राचीन गुंफाचित्रे शोधून काढली. ही जगातली सर्वात प्राचीन म्हणजे किमान ५० हजार वर्षांपूर्वीची गुंफाचित्रे आहेत असा निर्वाळा खुद्द फ्रेंच वैज्ञानिकांनी दिला.

सिंगापूर या चिमुकल्या देशात पाण्याचा फार तुटवडा आहे. त्यावर तोड म्हणून तिथल्या वैज्ञानिकांनी पाण्याचा ‘न्यू वॉटर’ हा अत्यंत अभिनव प्रकार शोधून काढला आहे. काय आहे या ‘न्यू वॉटर’मागची वैज्ञानिक प्रक्रिया? अशा प्रकारचे अत्यंत ‘हट के’ असे विषय शोधून त्यावर एकदम साध्या, सोप्या, ओघवत्या पण वैज्ञानिक सत्य मांडणाऱया प्रवासांच्या विज्ञानकथा डॉ. बाळ फोंडके यांनी इथे सादर केल्या आहेत. एकंदरीत पुस्तक अत्यंत वाचनीय आणि प्रेक्षणीयसुद्धा. कारण भरपूर रंगीत चित्रेही आहेत. सतीश भावसार यांचे उत्कृष्ट मुखपृष्ठ; मांडणी, मुद्रण आदी तांत्रिक अंगे सुबक. ग्रंथालीची उत्तम निर्मिती.

ना पूर्व, ना पश्चिम
लेखक – डॉ. बाळ फोंडके
प्रकाशक – ग्रंथाली
पृष्ठ – १५०, मूल्य – २५० रुपये