वांद्रय़ात उभे राहणार पहिले स्क्रॅप यार्ड

>>इंद्रायणी नार्वेकर-करंबे

डंपिंग ग्राऊंडवर टाकता येणार नाही अशा भंगार सामानाची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईत पाहिले क्रॅप यार्ड उभारण्याचे पालिकेने ठरवले आहे. वांद्रे पूर्वमध्ये यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून तसे आरक्षण नवीन विकास आराखडय़ात देण्यात आले आहे.

पालिकेने नवीन विकास आराखडय़ात मुंबईकरांना विविध सेवा देण्यासाठी तब्बल 140 विविध आरक्षणे टाकली आहेत. उद्याने, मैदाने, बेघरांसाठी घरे, स्मशानभूमी, दवाखाने, शाळा अशा नागरी सुविधांबरोबरच काही आरक्षणे पहिल्यांदाच देण्यात आली आहेत. त्यात प्रथमच क्रॅप यार्डसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. जुन्या गाडय़ा, धातूच्या मोठमोठय़ा भंगारातल्या वस्तू, मशिनरी अशा सगळय़ा गोष्टी आजवर डंपिंग ग्राऊंडवर जात होत्या. मात्र डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यामुळे अशा वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी हे क्रॅप यार्ड वापरले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. विकास आराखडा अद्याप राज्य सरकारने मंजूर केलेला नसला तरी नागरी विकासाची आरक्षणे विकसित करण्याकरिता पालिकेने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

27 ठिकाणी कचरा वर्गीकरण केंद्र

डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यामुळे पालिकेने ओल्या कचऱयाची विल्हेवाट स्थानिक पातळीवरच लावण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरणही स्थानिक पातळीवरच करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक वॉर्डात कचरा वर्गीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नवीन विकास आराखडय़ात 27 ठिकाणी कचरा वर्गीकरण केंद्रांसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे.

अशी आहेत अन्य आरक्षणे

उद्याने आणि मैदाने ः 41
शाळा ः 12
दवाखाने ः 8
मंडई ः 4
मिनी फायर स्टेशन ः 17
कचरा वर्गीकरण केंद्र ः 27
बेघरांसाठी निवारे ः 4
महिलांसाठी वसतिगृह ः 1 (गोरेगावमध्ये)
पुनर्वसन प्रकल्प ः 1 बोरिवली