मिऱ्या समुद्रकिनारी स्कूबा डायव्हिंग

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीला लाभलेला अथांग समुद्रकिनारा, पर्यटनवृद्धी व्हावी, तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी मिऱ्या येथील समुद्रकिनारी स्कूबा डायव्हिंग सुरू केले आहे. स्कूबा डायव्हिंगमुळे समुद्रप्रेमी आणि पर्यटकांना समुद्रातील अंतरंग पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मैत्री ग्रूपचे कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई यांच्या बरोबरीने महेश शिंदे यांनी पुढाकार घेत स्कूबा डायव्हिंग मिऱया समुद्रकिनारी सुरू केले आहे. महेश शिंदे हे चीनमध्ये मरीन इंजिनमध्ये काम करत होते. चीनहून परत आपल्या गावात आल्यानंतर कोकणातील समुद्रकिनाऱयावर काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले. म्हणून त्यांनी कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकूरदेसाई यांच्याबरोबर मिऱया समुद्रकिनारी स्कूबा डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी गणेशगुळे, गणपतीपुळे, भाटय़े, कुर्ली, मिऱया अशा विविध ठिकाणी स्कूबा डायव्हिंग करून स्पॉटचा शोध घेतला. त्यांना मिऱया येथेच स्कूबा डायव्हिंगसाठी योग्य असा स्पॉट महिनाभरानंतरच्या प्रयत्नानंतर मिळाला. आता त्यांनी चार-पाच दिवस प्रायोगिक तत्त्वावर हर्षा हॉलिडेजच्या नावाने स्कूबा डायव्हिंग सुरू केले असून २१ डिसेंबरपासून पर्यटकांसाठी हे स्कूबा डायव्हिंग खुले होणार आहे.

स्कूबा डायव्हिंगसाठी लागणारे किट हे आंतरराष्ट्रीय दर्जाचेच असावे अशी पर्यटकांची अट असते. ही अट त्यांनी पूर्ण करताना स्कूबा डायव्हिंगसाठी ६ प्रशिक्षित स्कूबा डायव्हरही नेमण्यात आले आहेत. पर्यटकांना अर्ध्या तासामध्ये समुद्राच्या अंतरंगाचा आस्वाद घेता येणार आहे. मिऱया समुद्रकिनारी रंगीबेरंगी मासे, शेवाळ आणि समुद्र जैवविविधता पर्यटकांबरोबरच समुद्र अभ्यासकांनाही पाहता येणार आहे.

नाइट रायडिंगही सुरू करणार

दिवसा समुद्राचे अंतरंग आणि रात्रीचे समुद्राचे अंतरंग यातही फरक जाणवतो. अनेकांना रात्रीच्या वेळीही स्कूबा डायव्हिंग करण्याची इच्छा असते. मिऱया येथे नाइट रायडिंग करण्याची मोहीम लवकरच हाती घेतली जाणार आहे. त्याकरिता आवश्यक असलेले टॉर्च आणि अन्य साहित्यही उपलब्ध करण्यात आले आहे.