सोशल मीडियावर माझी बदनामी करणाऱ्यांचा शोध घ्या – खा. विनायक राऊत

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

आपल्या विरोधात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या मनात आपले डिपॉझिट जप्त होण्याची भिती निर्माण झाल्यानेच विरोधी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मोडियाचा वापर करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असा आरोप करत आपली बदनामी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या टोळक्याचा सायबर क्राईम मार्फत शोध लावून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गुरुवारी खा. विनायक राऊत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत खा. राऊत यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडेही निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात “एका दूरदर्शन वाहिनीवरील एक न्यूज एडिट करून त्यात कोकणातले नालायक भाजपवाले विकले गेलेत” अशी ब्रेकिंग तयार करून ती सोशल मीडियावर फिरविली जात आहे. याबाबत आम्ही त्या चॅनेलच्या वरिष्ठ व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनी असे वृत्त आम्ही प्रसारित केलेच नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेली ही न्यूज फेक असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे समाजात वातावरण बिघडू शकते. याबाबत सखोल चौकशी करून फेक न्यूज तयार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनासोबत सोशल मीडियावर फिरत असलेल्या मॅसेजचे स्क्रीन शॉट मारून जोडण्यात आले आहेत.

खा. विनायक राऊत म्हणाले की, आपला जनतेशी असलेला संपर्क पाहता लोकसभा निवडणूकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली बदनामी करण्यासाठी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. तसेच आपल्या तोंडी नको ती वाक्ये टाकून शिवसेना व भाजपा या मित्र पक्षांमध्ये कलह निर्माण करण्याचा कट असल्याचा आरोपही खा. राऊत यांनी यावेळी केला आहे.