डिसेंबरपासून एकच तिकीट,वडाळा–सातरस्ता ‘मोनो’ही धावणार

सामना ऑनलाईन, मुंबई

गेली बरीच वर्षे रखडलेल्या मोनोरेलचा वडाळा ते सातरस्ता (जेकब सर्कल) हा दुसरा टप्पा डिसेंबर २०१७ अखेर कार्यरत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. त्याबरोबरच रेल्वे, बस आणि मेट्रोसाठी एकत्र तिकीट आकारणी करणारी एकात्मिक तिकीट प्रणाली वर्षअखेरीपर्यंत राबविण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी एका बैठकीत आढावा घेतला. उपनगरीय रेल्वेची गर्दी आणि रोज घडणाऱया अपघातांची संख्या पाहता मेट्रोची ही काळाची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी अंधेरी (पूर्व )ते दहीसर (पूर्व )मेट्रो मार्ग – ७ आणि दहिसर ते डि.एन.नगर मेट्रो मार्ग – २ अ च्या सुरू असलेल्या वेगवान कामांविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी चेंबूर ते वडाळापर्यंत सुरू असलेल्या मोनोरेलचा दुसरा वडाळा ते सातरस्ता हा टप्पा डिसेंबरपर्यंत कार्यरत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच रेल्वे, मेट्रो, बस सारख्या सार्वजनिक सेवांसाठी एकच तिकीट आकारण्याच्या सर्वंकष तिकीट प्रणाली व्यवस्था वर्षअखेरीस सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाला  यावेळी दिल्या.

आंबेडकर स्मारकाची वर्क ऑर्डर नोव्हेंबरमध्ये

मुख्यमंत्र्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील नियोजित स्मारकाच्या कामाची कर्क ऑर्डर नोक्हेंबर महिन्यात काढण्याचे आदेश दिले तसेच  विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग प्रकल्पाला गती मिळण्याकरिता हा प्रकल्प वॉर रूमच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. शिवडी ते न्हावाशेवा मुंबई पारबंदर प्रकल्प, मेट्रो, मल्टी मोडल कॉरीडोर, हायब्रीड बसेस, बीकेसी चुनाभट्टी कनेक्टर, कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूल, बीकेसी ते वाकोला उन्नत रस्ता, छेडा नगर जंक्शन उड्डाणपूल, कल्याण आणि भिवंडी विकास केंद्र इ. प्रकल्पांची प्रगती दर्शविणारे १०५ स्लाइड्सचे सादरीकरण करण्यात आले.