पृथ्वीकडे येणारे गूढ संदेश!

दा. कृ. सोमण, [email protected]

मागील काही वर्षे अंतराळातून पृथ्वीकडे काही गूढ संदेश येत आहेत. हे संदेश पृथ्वीकडे कोण पाठवीत आहे, या विश्वात पृथ्वी व्यतिरिक्त इतर कुठे जीवसृष्टी आहे का, ती जीवसृष्टी प्रगत आहे की मागासलेली, ती जीवसृष्टी नेमकी कुठे आहे, आपल्या पृथ्वीपासून किती अंतरावर आहे, ती जीवसृष्टी कोणता संदेश आणि कशासाठी पृथ्वीकडे पाठवतेय, ती जीवसृष्टी पृथ्वीवर येईल का, आपले पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचे प्रश्न सोडविण्यास मदत करील का, परग्रहावरची ही माणसे कशी असतील, असे एक नाही अनेक प्रश्न नेहमी आपल्या मनात येत असतात. सध्या या विषयी अधिक चर्चा होताना दिसत आहे. याला कारणही तसेच महत्त्वाचे आहे. कारण सध्या पृथ्वीपासून तीन अब्ज प्रकाश वर्षे दूर अंतरावर असणाऱया एका दीर्घिकेतून काही संदेश येऊ लागले आहेत. ही दीर्घिका पृथ्वीपासून इतकी दूर आहे की तिच्यापासून निघालेला प्रकाश किरण एका सेकंदाला तीन लक्ष किलोमीटर या वेगाने पृथ्वीपर्यंत यायला तीन अब्ज वर्षे लागतील! पण हे येणारे संदेश गूढ आहेत. हिंदुस्थानीय वंशाचे शास्त्रज्ञ विशाल गज्जर यांनी या गूढ संदेशाबद्दलची ही माहिती नुकतीच जाहीर केली आहे. शास्त्रज्ञ विशाल गज्जर हे स्टीफन हॉकिंग यांच्या एका प्रकल्पावर काम करीत आहेत. बर्कले येथील विद्यापीठाच्या एका नियतकालिकात हे संशोधन जाहीर होणार आहे.

विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि रशियातील एक अब्जाधीश युरी मिलनर यांनी ‘ब्रेक थ्रू लिसन प्रकल्प’ सुरू केला आहे. या प्रकल्पाचा मूळ उद्देश विश्वाचे सत्य जाणून घेणे आणि प्रगत जीवसृष्टीचा शोध घेणे असा आहे. ही संस्था या पृथ्वीकडे येणाऱया गूढ संदेशाविषयी अधिक संशोधन करीत आहे. सन २०१६ आणि सन २०१७ मध्ये असेच संदेश आले होते. ते संदेश एखाद्या सुपरनोव्हामुळे आले होते की प्रगत जीवसृष्टीने ते पाठवले होते याचे खरे उत्तर अजून मिळालेले नाही. या विषयामध्ये एक मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा एका प्रश्नाचे उत्तर मिळते नवीन दहा प्रश्न नव्याने समोर येतात.

आपल्या सूर्यमालेमध्ये पृथ्वीखेरीज कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पण आपली सूर्यमाला ज्या आकाशगंगेत आहे तेथे कुठल्यातरी सूर्यमालेतील एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असू शकेल. समजा तेथेही जीवसृष्टी नसली तरी आपली आकाशगंगा ज्या आकाशगंगांच्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमधील कोणत्यातरी आकाशगंगेतील एखाद्या सूर्यमालेतील ग्रहावर जीवसृष्टी असू शकेल. समजा तेथेही जीवसृष्टी नसली तरी दुसऱया ग्रुपमधील आकाशगंगेतील एखाद्या सूर्यमालेतील ग्रहावर जीवसृष्टी असू शकेल. या विश्वात आपण एकटे नाही कुठेतरी, कोणीतरी असेलच असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. म्हणून स्टीफन हॉकिंगसारखे बरेच शास्त्रज्ञ परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत.

पृथ्वीवर येणारे हे गूढ संदेश नैसर्गिक आहेत की ते परग्रहावरून कोणीतरी मुद्दाम पाठवतोय याचाही शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. जर परग्रहावर प्रगत जीवसृष्टी असेल तरच ते असे संदेश पाठवू शकतील असेही शास्त्रज्ञांना वाटते. जर ते अप्रगत असतील तर ते संदेश पाठवूच शकणार नाहीत!

परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत असताना पृथ्वीवर ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी असलेल्या ग्रहांचा शास्त्रज्ञ शोध घेत असतात. त्यानंतर तो ग्रह किती वर्षांपूर्वी झाला याचाही अभ्यास केला जातो. परंतु हे सर्व पृथ्वीसापेक्ष संशोधन चालले असते. काही शास्त्रज्ञांना वाटते परग्रहावरची जीवसृष्टी वेगळ्या परिस्थितीतही जगत असेल!

समोर अनेक अडचणी असल्यातरी या विषयात प्रत्येकाला कुतूहल वाटत असते. या विश्वात आपण नक्कीच एकटे नाही असा ठाम विश्वास अनेकांना वाटत असतो. आपणही संदेश पाठवत असतो. हा संदेश कुणाला पाठवतो हे मात्र सांगता येत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर आपण परग्रहावरील मानवाला हाका मारीत आहोत जर कुठे असा माणूस असेल आणि तो प्रगत असेल तर आपल्या हाकेला ‘ओ’ देईल. जर तो अतिप्रगत असेल तो परग्रहावरचा माणूस चक्क पृथ्वीवर पाय ठेवील! पृथ्वीवरील सध्याचे गंभीर प्रश्न तो अतिप्रगत असल्याने सोडविण्यासाठी मदत करू शकेल. निदान माणसाने माणसासारखे कसे वागायचे याचे शिक्षण देण्यासाठी तरी त्या परग्रहावरून आलेल्या अतिप्रगत मानवाचा आपणास चांगला उपयोग होऊ शकेल.