आरे कॉलनीत मेट्रोसाठी गुपचूप खोदकाम सुरू

आरे कॉलनीत मेट्रो रेल्वे कारडेपोच्या प्रस्तावित जागेवरील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. ते न जुमानता मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसी) खोदकाम सुरू केले आहे. त्याविरुद्ध पर्यावरणप्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एमएमआरसीविरुद्ध तीन पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत.

मेट्रो-3 चा कारडेपो आरे कॉलनीत उभारण्याचा एमएमआरसीएच्या निर्णयाला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला होता. ते प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाकडे गेले होते. लवादाने आरे कॉलनीत बांधकामाला मनाई केल्यानंतरही एमएमआरसीएने संबंधित जागेच्या बाजूच्या भूखंडावर खोदकाम सुरू केले आहे. त्याविरुद्ध ‘सेव्ह आरे’ आणि ‘वनशक्ती’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आरे पोलीस ठाण्यात तीन तक्रारी केल्या आहेत. पोलीस तिसऱ्या तक्रारीनंतर घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली, अशी माहिती या कार्यकर्त्यांनी दिली. ‘सेव्ह आरे’ आणि ‘वनशक्ती’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मेट्रोसाठी खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणाची छायाचित्रे घेतली असून ती राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केली जाणार आहेत. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी मात्र हरित लवादाच्या आदेशाचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचा दावा केला आहे.