भाजप आमदाराच्या हत्येत सामील असलेल्या दोन नक्षलींचा चकमकीत खात्मा

2

सामना ऑनलाईन । रायपूर

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजप आमदार आणि त्यांच्या चार सुरक्षारक्षकांची हत्या करण्याच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला.

दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे 5.30 वाजात सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलींनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षादलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. काही केळाने नक्षली जंगलात पसार झाले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली असता दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाचे महासंचालक गिरधारी नायक यांनी सांगितले की, चकमकीत खात्मा झालेला नक्षली वर्गीस याच्याकर पाच लाख रुपयांचे इनाम होते आणि तो सुरुंगद्वारे स्फोट घडकिण्यात तज्ञ होता. भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटातही वर्गीस याचा सहभाग होता. या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नक्षल्यांनी घडविलेल्या स्फोटात आयटीबीपीचा जवान जखमी

राजनंदगाव छत्तीसगडमधील राजनंदगाव जिह्यात लोकसभेचे मतदान सुरू असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलातील जवान मानसिंग हे जखमी झाले. कोराचा माणपूर परिसरात मेढा आणि डाब्बा गावानजीक सकाळी 11 वाजता हा स्फोट झाला. आयटीबीपीचे पथक गस्त घालीत असताना ही घटना घडली. जखमी जवानाची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.