बँकेच्या सुरक्षारक्षकानेच केली चोरी, लॉकरमधले 11 लाखांचे दागिने केले लंपास


सामना ऑनलाईन । चंदिगड

कुंपणाने शेत खाणे नावाची म्हण मराठीत प्रचलित आहे. याच म्हणीचा प्रत्यय चंदिगडमध्ये आला असून इथे एका बँकेच्या सुरक्षा रक्षकानेच बँकेच्या ग्राहकाच्या दागिन्यांची चोरी केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च महिन्यात 7 तारखेला देविका महाजन या चंदिगड येथील मनीमाजरा येथील ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सच्या शाखेत आल्या. त्यांना आपले दागिने लॉकरमध्ये ठेवायचे होते. त्यांच्याकडे तब्बल 11 लाख रुपये किमतीचे दागिने होते. पण, दुर्दैवाने त्या ते लॉकर रूममध्ये घेऊन गेल्या मात्र दागिने लॉकरमध्ये ठेवायला विसरल्या. त्यानंतर 13 मार्च रोजी त्यांनी पुन्हा आपला लॉकर उघडला तेव्हा त्यात दागिने नव्हते. त्यामुळे त्यांनी शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. तेव्हा लॉकर रूममध्ये गेलेल्या सुरक्षा रक्षक अशोक कुमार याच्यावर पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी त्या संशयावरून अशोक कुमार याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने चोरी केल्याचं कबूल केलं. दागिन्यांनी भरलेली महाजन यांची पिशवी अशोक याने पळवली आणि स्वतःच्या घरातल्या वॉशिंगमशीनमध्ये लपवून ठेवली. ते दागिने विकण्याचा त्याचा मानस होता, पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.