महाराष्ट्राच्या ‘सीड मदर’साठी अच्युतानंद द्विवेदींना कान्समध्ये पुरस्कार

127

सामना प्रतिनिधी । कान्स

सध्या सुरू असलेल्या 72 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये हिंदुस्थानी चित्रपट निर्मात्याने चमकदार कामगिरी केली आहे. अच्युतानंद द्विवेदी यांच्या ‘सीड मदर’ या लघुपटाला ‘नेप्रेसो टॅलेंटस्- 2019’ या विभागात तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

अच्युतानंद द्विवेदी हे मूळचे मुंबईचे आहेत. मुंबईतील जगण्याचा वेग आपला बळी घेईल याची जाणीव झाल्याने ते सध्या पद्दुचेरी येथे राहतात. कान्स महोत्सवात नेप्रेसो टँलेंट या विभागात यंदा वुई आर व्हॉट वुई इट म्हणजेच अन्नाच्या माध्यमातील अनुभवांची देवाणघेवाण हा विषय दिला होता. यात शेती व जैवविविधता, अन्न वारसा व मूल्य साखळी, लोकप्रिय संस्कृतीतील अन्न असे तीन विषय होते.

या स्पर्धेसाठी 47 देशांमधून 371 लघुपटांच्या एंट्री आल्या होत्या. त्यापैकी नेप्रेसो विभागात पहिला पुरस्कार आंतरराष्ट्रीय गटात न्यूझीलंडच्या जोश मॉरिस यांना बालीमधील तांदूळ लागवडीवर आधारित सुबक या लघुपटासाठी मिळाला. तर दुसरा पुरस्कार हा मेक्सिकन निर्माते मार्को ऑरेलिओ सेलीस यांना रूफो या लघुपटासाठी मिळाला आहे. 

काय आहे लघुपटात?

‘सीड मदर’ या लघुपटात महाराष्ट्राच्या नगर जिह्यातील बीजमाता म्हणून ओळखल्या जाणार्‍या राहिबाई सोमा पोपरे यांची कहाणी मांडली आहे. राहिबाई यांनी कृषी क्षेत्रात घडवून आणलेले बदल, तयार केलेली बीजपेढी यांचे चित्रण द्विवेदी यांनी या लघुपटात केले आहे. त्यांच्या बीजपेठीतील बियाणे आज राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या