कुर्ला एसटी डेपोतील जप्त केलेल्या खासगी गाड्यांना भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

1

सामना प्रतिनिधी, मुंबई

कुर्ला एसटी डेपोमध्ये ‘आरटीओ’ने जप्त करून ठेवलेल्या खासगी गाड्यांना आज सायंकाळी 4.30 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत आठ वाहने जळून खाक झाली. या आगीत गाडय़ांचे टायर, काचा आणि पेट्रोलमुळे परिसरात आगीचे लोळ व धूर पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. कुर्ल्यातील एसटी डेपोत ‘आरटीओ’ने अनेक प्रकरणांत जप्त केलेल्या गाडय़ा ठेवल्या.

यामध्ये मोठय़ा प्रवासी बससह ओमनी कारसारख्या गाडय़ांचाही समावेश आहे. या गाडय़ांना आज अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. यामध्ये एसटी कर्मचारी आणि स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. दरम्यान, या आगीत सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपविभाग संघटक मनीष मोरजकर, माजी महिला शाखा संघटक छाया सालदूर आदी उपस्थित होते.