स्वसंरक्षण

>>नम्रता पवार<<

आजची आई सतत २४ तास आपल्या मुलांबरोबर राहू शकत नाही. पण मुलांच्या भवतालची सगळीच माणसं चांगली असतील याची काय खात्री… अशावेळी आईनेच आपल्या बाळांना स्वसंरक्षणाचे पाठ द्यायला हवेत…

सात वर्षांची गौरी… अतिशय खेळकर मुलगी. तिच्याकडे तिच्या खळाळून हसण्याकडे पाहून वाटायचं जणू उदास राहणं तिला माहीतच नाही. शाळेतून घरी उंबरठय़ाच्या आत पाऊल टाकतचं तिची अखंड बडबड सुरू व्हायाची. मात्र काही दिवसांपासून अचानक ती अबोल राहू लागली. ना शाळेत जाण्याचा उत्साह ना खेळण्याचा. सतत आईला तूच मला शाळेत सोडायला येत जा असाच तिचा घोशा सुरू असायचा.

थोडे दिवस आईने याकडे दुर्लक्ष केलं, परंतु हे असं दररोजच व्हायला लागलं तसं मात्र तिलाही काळजी वाटू लागली. तेव्हा मात्र गौरीला जवळ घेत तुला टिचर ओरडतात का? कोणी मित्र-मैत्रिणी त्रास देतात का? विचारायला सुरुवात केली तरीही ती नाही म्हणत होती. शेवटची सहजच तिच्या आईने व्हॅनवाले काका रागावतात का, असे विचारले तेव्हा ती आईला घाबरून बिलगली आणि रडायला लागली आणि तिने रडतच व्हॅनवाले काका सतत तिच्या ओठांची पप्पी घेत राहतात.

गौरी जेव्हा घाबरून मागच्या सीटवर बसू लागली तेव्हा तिला पुन्हा बाजूला बसवत त्यांनी सांगितलं की, तुझे आईबाबा जसं तुझ्यावर प्रेम करतात, पप्पी घेतात तसंच माझंही तुझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे मी हे करतो आणि हे आपलं सिक्रेट आहे. आईबाबांना अजिबात सांगायचं नाही. तुला हे हळूहळू आवडायला लागेल. हे सर्व ऐकून गौरीची आई अक्षरशः हादरूनच गेली. मात्र स्वतःला सांभाळत तिने गौरीला जवळ घेतलं आणि आता तुला कोणालाच घाबरायची गरज नाहीये सांगितलं आणि घडलेला प्रसंग तिच्या बाबांना सांगितला.

गौरीच्या आईबाबांनी सर्वप्रथम त्यांच्या एका समाजसेविका मैत्रिणीला हे सर्व सांगितले आणि तिच्या मदतीने भविष्यात कोणत्याही मुलांवर हा प्रसंग घडू नये म्हणून ड्रायव्हरची पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच गौरीलादेखील समजावलं की यापुढे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास कोणी दिला तर त्याला विरोध कर आणि कोणतीही गोष्ट आईबाबांपासून लपवू नकोस.

खरोखरच ही गोष्ट केवळ गौरीचं नाही तर तिच्यासारख्या अनेक मुली व मुलांबाबतही घडताना दिसते. अनेक लहान मुलं, अपंग, गतिमंद मुलं भीतीने व अज्ञानानेही हा अत्याचार सहन करत राहतात आणि गुन्हेगाराचा उत्साह अधिक दुणावतो. अशा परिस्थितीत पालक खासकरून आईची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. आपण आपल्या मुलांना सर्व काही माहीत असावं म्हणून ज्ञान देतो, मुलंदेखील आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टी शिकत असते. परंतु अलीकडच्या काळात सेक्स एज्युकेशन देणं खूपच महत्त्वाचं होऊन बसलंय.

 नातेवाईकांवर पूर्णपणे विश्वासू ठेवू नका

खरंतर अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग वा लैंगिक शोषण हे जवळच्या नातेवाईकांकडूनच केले जाते. अशावेळी मुलांना तेही वेळीच सावध करा. त्यांना समजावून सांगा की आपण एकत्र कुटुंबात राहत असलो तरी थोडे अंतर राखूनच राहायला हवे. शरीराचे झाकून ठेवणारे भाग फक्त आईचं पाहू शकते. इतर जण नाही हे त्यांना समजावून सांगा. घरातील कोणत्याही व्यक्तीने जबरदस्ती केली तर न घाबरता त्यांना विरोध करा. शेजारचे काका वा आजोबा यांच्या घरी एकांतात मुलांना पाठवू नका. कोणी कितीही सभ्य, सुशिक्षित असलं तरीही त्याक्षणी कोणाला काय वाटेल हे सांगता येत नाही.

खरोखरच लहानपणापासून पालकांनी घरातील वातावरण विश्वासाचं, खेळकर ठेवलं तर मुलं नक्कीच त्यांचे प्रश्न, ज्ञिज्ञासा आईवडिलांकडे घेऊन येतील. एवढं झालं तरी कितीतरी गुन्हे कमी होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मुलांना समजेल की आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या आईजवळ आहे तेव्हा ते बारच्या जगाची कधीच मदत घेणार नाहीत आणि हे तुमचं सर्वात मोठं यश असेल.

घरातील वातावरण खेळकर असावं

एक आई या नात्याने प्रत्येक मूल आईला सर्वाधिक जवळ असतं. मात्र आई असण्याबरोबरच मुलांची बेस्ट फ्रेंड बनवताना अधिक प्रयत्न करा. ज्यामुळे मूल तुमच्याशी सर्व गोष्टी सहजपणे शेअर करू शकेल. मुलांनी बॉडी पार्टस्संबंधी काही प्रश्न विचारले तर तू अजून लहान आहेस, मोठं होशील तेव्हा तुला सर्वकाही समजेल असं सांगून त्यांचा प्रश्न दुर्लक्षित करू नका.

भलेही तुम्ही तेवढय़ापुरता तो प्रश्न टाळला तरी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात त्यांच्या प्रश्नांची उत्तर ते दुसरीकडून शोधू लागतील. तिथून कदाचित त्यांना अर्धवट माहिती मिळेल आणि ते काहीतरी चुकीचे करून बसतील. यापेक्षा आईने तिच्या क्षमतेनुसार मुलांच्या प्रश्नांचं समाधानपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. मुलांचं वय पाहून त्यानुसार उत्तर द्यावं. मात्र असंही करून आईने त्यांची बेस्ट फ्रेंड बनण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यांच्या मनात जेव्हा एखादा प्रश्न येईल ते उत्तरासाठी तुमच्याकडेच येतील.