राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते

सामना प्रतिनिधी । कुडाळ

अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या यजमान पदाखाली भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत व बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ऑईल, ओएनजीसी व सारस्वत बँक सह पुरस्कृत कुडाळ येथील 47 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरूष एकेरी गटात आयआरबीच्या प्रशांत मोरे तर महिला एकेरी गटात पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डाच्या रश्मी कुमारी यांनी विजेतेपद पटकाविले.

कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे गेले पाच दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून कॅरमचा महासंग्राम रंगला होता. शनिवारी पुरूष व महीला गटातील अंतिम सामने रंगले. पुरूष एकेरी अंतिम सामन्यात आयआरबीचा प्रशांत मोरे याने विदर्भचा इर्शाद अहमद याचा 22-21, 25-13 असा पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. तर महीला एकेरी अंतिम सामन्यात पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डाच्या रश्मी कुमारीने जैन इरिगेशनच्या आयेशा महम्मद हिचा 19-7, 25-7 असा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकाविले. तसेच पुरूष वयस्कर एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शब्बीर खानने विजेतेपद तर महाराष्ट्राचा अस्लम चिकते याने उपविजेतेपद पटकाविले. तर महिला वयस्कर एकेरी गटात अंतिम सामन्यात महाराष्टाच्या मालती केळकरने विजेतेपद तर महाराष्ट्राच्या रोझिना गोदाद यांनी उपविजेतेपद पटकाविले.