पद्मावतीत बदल करण्याच्या सेन्सॉरच्या सूचना, नावातही होणार बदल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बहुचर्चित आणि तितकाच वादग्रस्त ठरलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आशादायक चित्र निर्माण झालं आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर आता एक तोडगा काढला आहे. समितीने पद्मावती चित्रपटात काही बदल सुचवले असून त्याला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याखेरीज चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातील २६ दृश्यांवर सेन्सॉरने कात्री लावण्याचा निर्णयही घेतला आहे.

समितीने सुचवलेले बदल अंमलात आणल्यानंतरच सेन्सॉरतर्फे या चित्रपटाला प्रमाणित करण्यात येणार असल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसंच, चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवण्यात येणाऱ्या ‘डिस्क्लेमर’मध्ये हा चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून तो काल्पनिक चित्रपट असल्याचंही स्पष्ट करण्यात यावं, असंही सेन्सॉर समितीकडून सांगण्यात आलं आहे. या चित्रपटातील गाजत असलेल्या ‘घुमर’ या गाण्यातही काही बदल सुचवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी नमते घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामुळे उठलेलं वादाचं मोहोळ पाहता भन्साळी आता काय निर्णय घेतील, याची चर्चा सध्या रंगली आहे. सध्या थंडावलेली पद्मावतीवरची चर्चा पुन्हा सुरू झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे.