मृत्यूशी झुंज देणाऱ्या महेशला हवाय मदतीचा हात

133

सामना प्रतिनिधी, शिर्डी

शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईहून निघालेला 23 वर्षीय महेश घाडगे हा तरुण सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. शिर्डी मार्गावर त्याच्या मोटारसायकलला झालेल्या भीषण अपघातात महेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचे कपाळ फुटले आहे. तेथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या कपाळाचा भाग वेगळा काढण्यात आला आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारत असली तरी पुढील उपचाराचा खर्च त्याच्या कुटुंबाला परवडणारा नसल्याने महेशला जीवदान देण्यासाठी दानशूरांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन त्याच्या वडिलांनी केले आहे.

कांदिवली येथे आईवडिलांसोबत राहणारा महेश घाडगे हा शनिवारी 13 एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त मित्रासोबत बाईकने शिर्डीला निघाला होता. मात्र रस्त्यातच काळाने घाला घातला आणि भीषण अपघातात त्याचा मित्र जागीच ठार झाला. महेशच्याही कवटीचे तुकडे झाले. मात्र या भयंकर अपघातातून तो बचावला असून त्याची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. शिर्डीत त्याच्यावर शस्त्र्ाक्रिया झाली असून त्याच्या कपाळाचा काही भाग बाजूला काढण्यात आले आहे. त्यानंतर मुंबईतील विद्याविहार येथे असलेल्या कोहिनूर रुग्णालयात त्याला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वेदनांचा परिणाम त्याच्या उपचारावर होऊ नये यासाठी गेल्या आठ दिवसांपासून त्याला बेशुद्ध अवस्थेत व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. एक महिन्यानंतर त्याचे कपाळ प्रत्यारोपण करण्यात येणार आहे, पण हे सर्व उपचार आवाक्याबाहेर असून रुग्णालयाने साधारण 15 लाखांचा खर्च सांगितला आहे.

कर्ज म्हणून मदत करा!
महेश एका खासगी कार्यालयात अल्प पगारावर नोकरी करत आहे, तर त्याचे वडील बळीराम घाडगे यांची परिस्थिती बेताची आहे. लाखो रुपयांचा खर्च त्यांना परवडणारा नाही. आपल्या तरुण मुलाला वाचवण्यासाठी ते जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहेत. मदत म्हणून नव्हे कर्ज म्हणून हात पुढे करा, माझ्या मुलाला जीवदान द्या, अशी हाक त्यांनी दिली आहे. महेशला जीवदान देण्यासाठी दानशूरांनी विश्वंभर घाडगे यांना 9930906953 या क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा एस बँकेत महेश घाडगे – IFSC CODE – YSBOCMSNOC, खाते क्रमांक 8080811074124 वर थेट मदतनिधी जमा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या