विक्रमगडमध्ये सापांची मैत्रीण, २५० हून अधिक सापांना दिले जीवदान

101

सामना प्रतिनिधी । विक्रमगड

साप नुसता दिसला तरी भल्याभल्यांना घाम पुâटतो. इवलुसे सापाचे पिलू जरी निघाले तरी अख्खे घर बाहेर धावत सुटते, पण विक्रमगड येथील एका युवतीने या सापांशी घट्ट मैत्री केली आहे. दोन-चार नव्हे तर तब्बल २५० हून अधिक विषारी, बिनविषारी साप पकडून त्यांना तिने जीवदान दिले आहे.

पूनमने वयाच्या १८ वर्षांपासून सापांशी मैत्री केली आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ती आता बी.कॉमचे शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागात जन्मलेल्या आणि वाढलेल्या पूनमने साप दिसल्यानंतर लोकांची होणारी तारांबळ पाहिली आणि या धावपळीत सापांचे जाणारे बळीही पाहिले आणि तिने साप वाचविण्याचा निर्धार केला. तिला मदत मिळाली ती वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची. त्यानंतर ती सापांची मैत्रीणच झाली.

धोका पत्कारून पूनमने खेडोपाडी जाऊन जहाल विषारी साप पकडले आहेत. भारनियमनाच्या काळात तिने खेडोपाडी जाऊन मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मण्यार, घोणस, नाग असे अतिविषारी सापही कह्यात आणले आहेत. विशेष म्हणजे तिला अजूनपर्यंत एकदाही सर्पदंश झाला नाही. साप दिसला रे दिसला की लोक तिला आवर्जून फोन करतात.

मानवी वस्तीत निघणारा साप हा विषारी असो किंवा बिनविषारी भीतीपोटी लोक सापाला संपवतात. त्यामुळे पर्यावरण आणि बळीराजाचा मित्र असलेला साप नाहक मरतो. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांना जीवदान मिळावे यासाठी माझा खारीचा वाटा मी उचलतेय, असे पूनमने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या