न्यायडोंगरीत सात घरफोडय़ा; बारा लाखांचा ऐवज लंपास

3

सामना ऑनलाईन , नाशिक

दि. 11 (सा.वा.) – नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे चोरटय़ांनी शनिवारी मध्यरात्री दोन तासात तब्बल सात घरफोडय़ा केल्या. सराफी पेढय़ा, दवाखाना, कृषी केंद्र, दुकाने व घरांमधून बारा लाखांचा ऐवज पळविला. दोन ठिकाणी त्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला. एकाच रात्रीत चोरटय़ांनी मोठा धुमाकूळ घातल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवाजी चौक येथे डॉ. विष्णू आहेर यांच्या साई हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरटय़ांनी दोन हजार रुपये पळविले. चंद्रकांत भालेराव यांची नांदगावकर ज्वेलर्स ही पेढी फोडून सहा लाखांचे दागिने, साडेतीन किलो चांदी असा सवासात लाखांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर वैभव थोरात यांच्या सराफी पेढीतून सातशे ग्रॅम वजनाची 20 हजार रुपये किंमतीची चांदी लुटली. अरुण आहेर यांच्या घरातून साडेतीन लाख रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने असा चार लाखांचा ऐवज लांबविला. सुनील पाटील यांचे घर फोडून दहा हजार रुपये रोख, तीस हजारांचे दागिने चोरले. जितेंद्र आबड यांचे नांदगाव जनरल स्टोअर्सचे शटर उचकटून पंधराशे रुपये, तर नंदकुमार कटारीया यांच्या गौरव कृषी केंद्रातून दोन हजार रुपये लांबविले. निखील बावीस्कर यांची सराफी पेढी आणि पोस्ट ऑफिस फोडण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. बावीस्कर यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी अज्ञात घरफोडय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या भागात पहाटेच्या सुमारास पाच ते सहाजणांना काठय़ा घेवून जाताना ग्रामस्थांनी पाहिले. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, संशयितांचा शोध सुरू आहे.