पुण्यातील 7 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द, भाजप आणि राष्ट्रवादीला दे धक्का

सामना प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेतील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सात नगरसेवकांनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याचे पद रद्द करण्याची शिफारस पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी राज्य सरकारकडे केली. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरमधील सदस्यांचे पद रद्द केल्यानंतर या निर्णयाचा फटका पुण्यातील नगरसेवकांनाही बसला आहे. यात सर्वाधिक पाच नगरसेवक सत्ताधारी भाजपचे आहेत, तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाकडून तशी तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील तब्बल 20 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला.

न्यायालयाच्या या निर्णयात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांवर कारवाई करण्यात आले आहे. कारवाई झालेल्या सातपैकी सहा नगरसेविका आहेत. यात किरण जठार, फरजाना शेख, वर्षा साठे, कविता वैरागे आणि आरती कोंढरे या भाजपच्या नगरसेविकांचे पद रद्द होणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुक्साना इनामदार आणि नगरसेवक बाळा धनकवडे यांचेही पद जाणार आहे.

summary- seven corporatars of bjp and ncp got disqualified in pune