टायर फुटल्याने मिनीबसचा अपघात, १० जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळच्या सोग्रस गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कमीतकमी १० जणांचा मृत्यू झाला आहे. मिनी बसचा टायर फुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील सुभाष मैदानालगतच्या परिसरात राहणारे पालिकेचे सफाई कर्मचारी व त्यांचे नातेवाईक असे वीस ते पंचवीस भाविक श्रीक्षेत्र उज्जेन येथे देव दर्शनाला गेले होते. तिथून परत येत असताना सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये ७ महिला २ पुरूष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

परमार कुटुंबातील छाया परमार, धनुबाई परमार(५०) मंजुळा परमार (३५) व आठ वर्षाची चिमुकली प्रगती परमार  व बारा वर्षाची प्रतिज्ञा परमार तर वालोद्रा कुटुंबातील घावरी पानु बेरडीया वालोद्रा,अजय वालोद्रा त्याची पत्नी गुंजन वलोद्रा व भाऊ विजय वालोद्रा, घावरी कुटुंबातील प्रकाश घावरी (३८) त्यांची पत्नी जागृती, मुलगी कशिश (१२), निशा (१८), मुलगा पवन (८) तसेच गीता परमार, किसन चौहान आदी भाविक बस मध्ये बसलेले होते. अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या भाविकांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या दुदैवी घटनेने कल्याणातील पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.