सातवीतील विद्यार्थ्याचा कबड्डी सरावादरम्यान मृत्यू

68

सामना ऑनलाईन, शिरूर

कबड्डी सरावादरम्यान पिंपळे जगताप येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या एका सातवीतील विद्याथ्र्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि. ३१) सायंकाळी शिरूर तालुक्यात ही घटना घडली. दरम्यान, घटनेनंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण गंभीर बनले होते. यानंतर प्रांत अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या मध्यस्थीनंतर पालकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

गौरव अमोल वेताळ (वय १३, रा. न्हावरे, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्याथ्र्याचे नाव आहे.गौरव हा जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. शनिवारी (दि. ३१) जवाहर नवोदय विद्यालय येथे कबड्डी स्पर्धा सुरू होती. त्यावेळी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास दोन संघांत सामना सुरू असताना गौरव वेताळ अचानक मैदानावर कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर गौरवच्या पालकांनी या घटनेची चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कारवाईची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

आज सकाळी गौरवचे नातेवाईक, प्रांत अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, भाजपचे भगवान शेळके, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रमेश गलांडे यांची शिरूर पोलीस ठाण्यात बैठक झाली. यात खेळताना काढलेला ाqव्हडीओ, तसेच इतर गोष्टींबाबत चर्चा करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन प्रांत अधिकारी भाऊसाहेब गलांंडे यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी गौरवचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या