नाशिक जिल्हा गारठला ! कळवणला नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमान

सामना ऑनलाईन । नाशिक
नाशिक जिल्ह्यात एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल चार अंशांची घट झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. कळवणजवळील मानूर येथे आज मंगळवारी राज्यातील नीचांकी चार अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. निफाडचा पारा ५.४वर, तर नाशिकचा ६.५ अंशांवर घसरला आहे. थंडीच्या कडाक्याने द्राक्षमण्यांची उगवण थांबल्याने पहाटे बागांना पाणी देवून तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात या मोसमात आज मंगळवारी प्रथमच नीचांकी तापमान नोंदविले गेले असून, गारठल्यागत स्थिती आहे. शनिवारपासून तीन दिवस अंशत: ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली होती. सोमवारी नाशिकमध्ये किमान १०.३, निफाडला ९.८ व मानूर येथे ९ अंश सेल्सिअस तापमान होते. एकाच दिवसात पारा थेट चार ते पाच अंशांनी घसरला.
कळवणजवळील मानूर येथे शेतकरी धनंजय जाधव यांच्या शेतात आज किमान चार अंश सेल्सिअस तापमान होते. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात पारा ५.४ अंशावर घसरला. नाशिक शहरात ६.५, मालेगावला ८.४, तर जळगाव येथे ९.६ इतके तापमान होते.
रब्बी पिकांसाठी हे वातावरण पोषक असले तरी अतिथंडीमुळे द्राक्षाच्या झाडांची कार्यक्षमता कमी होते, द्राक्षमण्यांची उगवण थांबते, यामुळे दर्जा खालावतो. तापमान आणखी खाली घसरण्याच्या भितीने शेतकरी धास्तावले आहेत.