शाहीद आफ्रिदीचा यूटर्न, हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांवर केली आगपाखड

सामना ऑनलाईन । मुंबई

लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेत शाहीद आफ्रिदीने “पाकिस्तान स्वतःच्या देशातील चार प्रांत सांभाळू शकत नाही, मग कश्मीर काय सांभाळणार”, असे विधान केले होते. मात्र आफ्रिदीच्या विधानानंतर हिंदुस्थानमध्ये त्याची तुफान वाहवा झाली, तर पाकिस्तानमध्ये गदारोळ उठला. पाकिस्तानमधून जळजळीत प्रतिक्रिया आल्यानंतर काही वेळातच शाहीदने यूटर्न घेतला आणि खापर हिंदुस्थानी प्रसारमध्यमांवर फोडले. आपले विधान काटछाट करून दाखवल्याचा आरोप करत आफ्रिदीने हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांवर आगपाखड केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलण्याच्या ओघात पाकिस्तानलाच घरचा आहेर देणाऱ्या शाहीद आफ्रिदीवर पाकिस्तानात चहूबाजूने टीका होऊ लागली, तर काही पाकिस्तानी प्रसारमाध्यमं आफ्रिदिच्या बाजूने उभे राहिली. आपल्या वक्तव्याने मोठा गदारोळ माजल्याचे पाहून आफ्रिदीने ‘तो मी नव्हेच’ अशा अविर्भावात यूटर्न घेतला. “हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांनी माझ्या संभाषणाची क्लिप अर्धवट दाखवली आहे, मला माझ्या देशाचा आणि कश्मिरींच्या लढ्याचा सार्थ अभिमान आहे. किमान माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे”, असे आफ्रिदीने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.