ठसा : पांडुरंग वनमाळी


>>शाहीर आनंद सावंत

महाराष्ट्रातील शाहिरीचे स्वरूप प्रांतानुसार बदलत जाते. पश्चिम महाराष्ट्रातील शाहीर कडाडत्या डफावर पोवाडे गातात. खान्देशात अहिराणी भाषेच्या गोडव्यातून शाहिरी सादर करतात. मराठवाडा, विदर्भातील शाहीरांचा रंग वेगळाच, तर मुंबईतील लोकगीते आणि कोळीगीतांवर आधारित शाहिरीचा बाज वेगळाच असतो. अर्थात अस्सल कोकणी आवाजात कोळीगीते गायली ती शाहीर पांडुरंग वनमाळींनीच.

आजही आकाशवाणीवर लोकगीतांचा कार्यक्रम लागला म्हणजे तो पांडुरंग वनमाळींच्या कोळीगीताशिवाय पूर्ण होतच नाही. अशी ख्याती मिळविणाऱया शाहीर पांडुरंग वनमाळींचा जन्म 27 ऑगस्ट 1931 रोजी वसई तालुक्यातील माणिकपूर येथे झाला. समुद्रावर होडी हाकारत असताना सणासुदीच्या वेळी गायली जाणारी कोळीगीते पांडुरंग वनमाळींनी मुखोद्गत केली. एकीकडे कलेची आराधना करत असतानाच त्यांनी शालेय शिक्षण त्याच तन्मयतेने पुरे केले. सिद्धार्थ कॉलेजमध्ये बीएची पदवी मिळवून व एलएलबी होऊन त्यांनी वकिलीचा पेशा पत्करला. दिवसा वकिलीचा काळा कोट अंगावर चढवून फाडफाड इंग्रजी बोलणारा हा शाहीर संध्याकाळी मात्र पोवाडे, समरगीते, लोकगीते, कोळीगीते या गाण्यांत रंगून जात असे. महाराष्ट्रात ते एकमेव उच्चशिक्षित शाहीर होते. त्यांनी गायलेली गाणी आजही मनाला भिडतात.

हुंडा प्रतिबंध गीते, ‘कावळा पिपेरी वाजवतोय, मामा मामीला नाचवतोय’, ‘गोमू तुझ्या नादानं गो, बांधला बंगला’, ‘दिंडय़ा मोड गं पोरी’, ‘टिमक्याची चोळी’, ‘वसईची मी फूलवाली’, ‘आगीनगाडी बोलते लगीन गाडी’, ‘अगो सरगेवाली, होतेस का माझी नवरी’, ‘गोरी नवरी मांडवाखाली’, ‘लारुके आय गे सांग बापाला’, ‘मै बंबई देखकर आया रे, सुन मेरे शंकर भय्या’, ‘सण हाय नारळी पुनवेचा’, ‘चल बेगीन चल गं बंदरा’ अशी अनेक गीते त्यांनी गायली व कित्येक लिहिली.

शाहीर अमरशेख यांच्यासोबतही ते कार्यक्रमात असायचे आणि ‘सुटला वादळी वारा’ हे कोळीगीत त्यांच्या समवेत ते गायचे. त्यावेळी सुबल सरकार, अमरशेख, शेख जैनू चाँद, केशर चाँद धनावडे, शाहीर गजाभाऊ बेणी हे साथीला असायचे. त्यांनी जास्त गीते बालकराम वरळीकर, प्रभाकर वरळीकर, शंकर पाटील यांच्यासोबत गायली. त्यानंतर त्यांनी ‘शाहीर पांडुरंग वनमाळी आणि पार्टी’ या नावाने कला पथक सुरू केले. कुटुंबाचा विरोध असूनही आपल्या बहिणीला घेऊन कार्यक्रम सुरू केले.

बुलढाणा, जालना, नाशिक येथे एकदा शाहिरी मेळावा घेण्यात आला होता. त्या दौऱयाच्या वेळी शाहीर साबळे, सुबल सरकार, गजाभाऊ बेणी, रमेश कदम, नेराळे आम्ही सोबत होतो. त्यावेळी त्यांचा मला सहवास लाभला. त्यांचे अनेक पैलू त्यांच्या स्वभावातून जाणवू लागले. वकील असूनही अशिलांना कोर्टात न जाता दोन्ही पार्टींना समजावून ते त्यांचे प्रकरण मिटवीत. त्यांनी कधीही पैशांची हाव केली नाही. 1951 ते 1982, मुंबई येथील चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात विविध पदांवर नोकरी केली. मुंबई उच्च न्यायालयात ते राजपत्रित अधिकारी होते. 1985 ते 1990 मुंबई शहराचे उपनगरपाल होते. एवढा मोठा मान मिळूनही त्यांनी त्याचा कधी टेंभा मिरविला नाही. त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणाऱया शाहीरांतही ते मिसळून जात. 1966 साली त्यांना रौप्यपदक व प्रशस्तिपत्रक मिळाले. त्यांचा 75 वा वाढदिवस वसई येथे करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्नीच्या आठवणींचे एक पुस्तकही प्रकाशित केले. मात्र त्याच्या पुढील वर्षीच त्यांचे निधन झाले. त्यांची अनेक पुस्तके  प्रकाशित झाली आहेत. वर्तक विद्यालय, वसई या संस्थेचेही ते चिटणीस व विश्वस्त होते. तसेच समाज उन्नती मंडळ, सहयेग सहकारी संस्था, माणिकपूर दिवानमान गाव पंचायत या संस्थेचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे कोषाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. शाहीर आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.

(सहसचिव, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद)