शकिला

प्रशांत गौतम

जुन्या हिंदी कृष्णधवल सिनेमांतून लाजवाब अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱया अभिनेत्री शकिला यांच्या निधनाने अभिजात अभिनयाचा कालखंड लुप्त झाला आहे. ‘बाबूजी धीरे चलना’फेम अशी ओळख असलेल्या शकिला यांनी अनेक हिंदी सिनेमांतून अजरामर भूमिका करून रसिकमनाचा ठाव घेतला. प्रख्यात हिंदी गायिका शमशाद बेगम यांच्या आवाजातील अनेक गाणी शकिला यांच्यावर चित्रित झाली होती. त्यातील सर्वांच्या ओठावर असलेले गाणे म्हणजे ‘आरपार’ चित्रपटातील ‘बाबूजी धीरे चलना’ हे होय. त्याचप्रमाणे ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया’, ‘लेके पहला पहला प्यार’(सीआयडी) यासारखी कित्येक गाणी शमशाद बेगम यांच्या आवाजातून रसिकांच्या कानापर्यंत गेलीच होती. तद्वतच अनेक जुने हिंदी सिनेमेही अजरामर गीतांनी आणि अभिनेत्रींच्या दर्जेदार आणि सकस अभिनयाने रसिकांच्या थेट हृदयाशी भिडले होते. शकिला यांचा जन्म १९३५साली झाला. पुढील काळात त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांच्या वाटचालीचा सुवर्णबिंदू म्हणजे ‘आरपार’ व ‘सीआयडी’मधील सादर केलेल्या लोकप्रिय भूमिका होत. शक्ती सामंत यांच्या ‘चायना टाऊन’ या चित्रपटात शम्मी कपूरसोबत त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. ‘पोस्ट बॉक्स नं. ९९९’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयातील अदाकारी लाजवाब होती. हिंदी सिनेमातील प्रख्यात अभिनेते मनोजकुमार, राज कपूर, देव आनंद, सुनील दत्त या कसदार अभिनेत्यांसोबतही भूमिका करण्याची संधी शकिला यांना मिळाली. १९५० ते १९६० हे दशक जुन्या हिंदी सिनेमांचा खऱया अर्थाने सुवर्णकाळ. या कालखंडात चित्रपट गीतांमुळे तुफान लोकप्रिय होत असत. चित्रपटातील गाणी ऐकायला गोड आणि मधुर असली की, त्या चित्रपटाची कथा कोणती, चित्रपटात काम करणारे अभिनेते कोणते या बाबींशी रसिकांना फार देणे-घेणे नसायचे. कधी चित्रपट गाण्यांमुळे लोकप्रिय होत, कधी गाणी सुमार असतील तरी अभिनेत्यांच्या अभिनयामुळे ओळखले जायचे. मात्र काही हिंदी चित्रपटांमध्ये अभिजात गायक, दर्जेदार गाणी, सकस अभिनय या सर्वांचा ताळमेळ उत्तम प्रकारे बसलेला असायचा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीआयडी, आरपार, दास्तान, काली टोपी लाल रुमाल यासारखे चित्रपट सांगता येतील. कारण असे चित्रपट सर्वच बाजूंनी गुणवत्तेचा दर्जा गाठणारे असायचे आणि शकिलासारख्या अभिनेत्री चित्रपटात असल्या की, त्यांनी केलेला अभिनय, त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी कमालीची लोकप्रिय होत असत. शकिला यांनी दुनिया (१९४९), दास्तान (१९५०), अरमान, मदमस्त, शहेनशाह, आगोश (१९५३), दान, हल्लागुल्ला, गुलबहार, खुशबू लैला, लालपरी, अलिबाबा चालीस चोर, नूरमहल (१९५४), मस्त कलंदर, रत्नमंजिरी (१९५५), सीआयडी, कारवाँ, हातीमताई, झांसी की रानी, मलिका, पैसा ही पैसा, रूपकुमारी (१९५६), बेगुनाह, नागपद्मिनी, परिस्तान, आग्रारोड (१९५७), अलहिलाल, चोबीस घंटे, पोस्ट बॉक्स नं. ९९९ (१९५८), फोर्टी डेज, गेस्ट हाऊस, काली टोपी लाल रूमाल यासारख्या अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. शकिला यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरला होता. १९६३ मध्ये त्यांनी ‘उस्तादों के उस्ताद’ या चित्रपटात शेवटची भूमिका केली. १९६३ मध्ये त्यांनी या मायावी हिंदी सिनेजगतातून संन्यास घेतला. पुढील काळात शकिला या जॉनी बार्बर या गृहस्थाशी विवाहबद्ध झाल्या होत्या. लग्नानंतर त्या लंडनमध्ये स्थायिक झाल्या. त्यानंतर त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध उरला नाही. शकिला यांना मिनाझ ही मुलगी होती. १९९१च्या सुमारास तिचेही निधन झाले. हृदयविकार, मधुमेह अशा आजारांनी त्या त्रस्त होत्या. उमेदीच्या काळापासून सुरू झालेला प्रवास ८२व्या वर्षी संपला. शकिला यांच्या निधनाने जुन्या जमान्यातील अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे.