शक्ती मिल प्रकरणातील अल्पवयीन बलात्काऱ्याची व्यावसायिकांना मारहाण

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

शक्तीमिल कंपाऊंडमध्ये एका फोटोग्राफरवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मराठी व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याचा आणि मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अजय मटकर आणि त्याचा भाऊ अमित मटकर या दोघांना या गुंडाने त्याच्या साथीदारांसह मारहाण केली आहे. सध्या या दोघांवर नायर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या कार्यालयात हा गुंड आला होता आणि त्याने दर महिना ५० हजार रूपयांची खंडणी द्यावी लागेल असं म्हणत दमदाटी केली. याकडे दुर्लक्ष केल्याने अजयला एकूण ५ जमांनी ७ सप्टेंबरला एन.एम.जोशी मार्गावर मिनर्व्हा टॉवरच्या बाहेर मारहाण केली.  त्यानंतर महालक्ष्मी इथल्या मटकर यांच्या घराबाहेर अमितला मारहाण करण्यात आली.

या गुंडाला बलात्कार प्रकरणी बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. तिथून सुटल्यानंतर त्याने पुन्हा गुंडगिरी करायला सुरूवात केली आहे. जर त्याचवेळी या गुंडाला कठोर शिक्षा झाली असती तर आज ही वेळ आलीच नसती असे अजय आणि अमित मटकरांच्या आईने म्हटलं आहे.