आजीची उबदार शाल!

642

>>ज्योत्स्ना गाडगीळ

वर्षभर कोकीळेसारखे अज्ञातस्थळी दडी मारून बसलेल्या शाली, स्कार्फ, स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे थंडीत बाहेर येतात. आपल्याला ऊब देतात आणि ऋतू पालटला, की पुन्हा अंतर्धान पावतात. या उबेचे महत्त्व लक्षात घेऊन शालिनी ताम्हनकर या 82 वर्षांच्या आजी तीस वर्षांपासून हे उबदार कपडे विणून गरजवंतांना मोफत वाटप करत आहेत. वेळ जावा म्हणून नाही, तर वेळ सत्कारणी लागावा म्हणून!

लोकरीचे कपडे बनवणे हा काही ताम्हनकर आजींचा व्यवसाय नाही, तर ही त्यांनी जोपासलेली आवड आहे. याचे प्रशिक्षण त्यांना मिळाले `लोकल मुक्त विद्यापीठा’तून, अर्थात लोकल प्रवासातून! तरुणपणी शिक्षिका म्हणून कल्याण ते ठाणे हा प्रवास करत असताना सहप्रवासी असलेल्या महिलांकडून आजींनी ही कला अवगत केली. शिवाय `इंदुमती रिंगे’ यांच्या विणकाम पुस्तकातूनही त्यांना मार्गदर्शन लाभले. लोकलप्रवासात घेतलेले शिक्षण त्यांना निवृत्तीनंतर कामी आले. `वेळ कसा घालवावा?’ हा प्रश्न त्यांच्यासमोर नव्हताच, तर `वेळ सत्कारणी कसा लावावा’ हा प्रश्न होता. तेव्हा, लोकरीचे कपडे विणण्याची उबदार कल्पना त्यांच्या मनात डोकावली आणि सुरुवात झाली एका नव्या प्रवासाला.

निवृत्तीनंतर आपल्या यजमानांसह नाशिकच्या घरी मुक्कामाला असताना आजींचा बराचसा वेळ बागकाम करण्यात जात असे. उर्वरित वेळात स्वेटर विणून जवळच्या शाळेतल्या मुलांना, गोरगरीबांना ते स्वेटर भेट म्हणून देत असत. यजमानांच्या निधनानंतर मुलाच्या आग्रहाखातर त्या ठाण्यात स्थलांतरीत झाल्या. मुंबईच्या फ्लॅटसंस्कृतीत बागकामाला वाव नसला, तरी विणकामाला पुरेपुर वेळ होता. त्या वेळेचा सदुपयोग करून घेत त्यांनी दरमहा 2000 रुपयांची लोकर विणायची ठरवली. आजींना लागणारी लोकर सून आणून देते, त्यापासून आजी कपडे विणतात आणि तयार कपडे योग्य हाती पोहोचवण्याचे काम आजींची सून आणि मैत्रिणी करतात. गेली अनेक वर्षे हा सिलसिला असाच सुरू आहे.

नोकरीत असताना आजींचे ठाण्यात येणे जाणे असल्यामुळे, ठाण्यात त्यांच्या अनेक मैत्रिणी होत्या. आजही त्यांच्यात मैत्री टिकून आहे, हे विशेष! आजींच्या कामाचे त्यांच्या मैत्रिणींना खूप कौतुक आहे. त्यांची मेहनत सार्थकी लागावी, म्हणून त्या सगळ्या वितरणाची जबाबदारी आनंदाने स्वीकारतात. साधारण 25 कपडे तयार झाले, की त्या मैत्रिणींना कळवतात. त्यांच्या मैत्रिणी सेवाभावी संस्था, अनाथाश्रम, बालिकाश्रम, वृद्धाश्रम येथे चौकशी करून तेथील लोकांची संख्या विचारतात आणि हातोहात जाऊन वाटप करतात.

आजी या सेवेकडे त्या `वस्त्रदान’ म्हणून पाहतात. या अतिकष्टाच्या कामाचे शुन्य मूल्य आकारण्यामागे आजींची भूमिका विचारली असता, त्या सांगतात, `मला निवृत्ती वेतन मिळते, शिवाय विणकाम करणे हा माझा छंद आहे. या छंदाचा कोणाला उपयोग होत असेल, तर आनंदच आहे. उद्या मेल्यावर देवाने मला विचारले, `तुला शरीर सामथ्र्य दिले, पैसा दिला, बुद्धी दिली, त्याचा वापर तू काय केलास?’ यावर मला निरुत्तर राहण्याची वेळ येणार नाही.’

आजींच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्यात दडलेली प्रेमळ आणि शिस्तबद्ध शिक्षिका डोकावते. त्यांनी विणलेले लोकरीचे कोणतेही कपडे बघा, त्यात टापटीपपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता डोकावते. दुकानात मिळावेत, तसे नानाविध रंगाचे, आकाराचे स्वेटर, कानटोप्या, स्कार्फ आजींच्या हातून घडल्या आहेत, यावर विश्वासच बसणार नाही, इतके ते कपडे सुबक आणि सुंदर आहेत. लोकरीच्या कपड्यांचे सगळे प्रकार आपल्यासमोर मांडून त्या विचारतात, `तुला यातले काय हवे, काय उपयोगी पडणार आहे, ते घेऊन जा!’

आजी वयाच्या 82 व्या वर्षी सात ते आठ तास विणकाम करत आहेत. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होऊनही त्यांच्या कामात खंड पडलेला नाही. उलट आता जास्त चांगले दिसत असल्याने, कामाला वेग आला, असे त्या गमतीने सांगतात. आपण हे विणकाम का करतोय, कोणासाठी करतोय, कोण वापरणार आहे, हे सगळे विचार त्यांच्या मनाला शिवतही नाहीत. त्या फक्त आपले काम चोख बजावतात. आजींची कल्पकता, क्षमता आणि आवड पाहून त्यांच्या एका मैत्रिणीने काही वर्षांपूर्वी त्यांना आणखी एक समाजोपयोगी प्रोजेक्ट मिळवून दिला होता.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कर्करोगतज्ज्ञ धामणकर दांपत्य ठाण्यात आले होते. एका कार्यक्रमात त्यांनी स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांसाठी लोकरीत विणलेल्या कापसाचा ब्रेस्ट बॉल कसा असतो, तो दाखवला होता. तसे ब्रेस्ट बॉल करून कोणी अमेरिकेत पाठवू शकेल का? असा प्रश्नही विचारला होता. त्यावर आजींच्या मैत्रीणींनी परस्पर आजींचे नाव सुचवले आणि या सामाजिक कामात त्यांना सहभागी करून घेतले. आजींनी ब्रेस्ट बॉलची रचना जाणून घेतली आणि ठरलेल्या अवधीत थोडेथोडके नाही, तर 65 ब्रेस्ट बॉल मैत्रिणींच्या मदतीने अमेरिकेला रवाना केले. तेव्हापासून आजतागायत या कामात खंड पडलेला नाही.

लोकरीच्या धाग्यांनी मला सावरले आहे, असे सांगताना आजी भावविवश होतात. त्यांचा 23 वर्षांचा मोठा मुलगा अपघातात गेला, हे दु:ख त्या सहन करू शकल्या नाहीत. शिक्षकी नोकरीचा त्यांनी राजीनामादेखील दिला होता. परंतु, त्यांच्या मुख्याध्यापकांनी तो स्वीकारला नाही. `तुमच्यासारखे जीव ओतून शिकवणारे शिक्षक शोधून सापडत नाहीत. विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे. त्यांनाच आपले अपत्य समजून त्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करा. घरी राहून स्वत:चे आणि मुलांचे नुकसान करू नका!’ अशा शब्दांत मुख्याध्यापकांनी आजींना नोकरी सोडण्यापासून परावृत्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरून आजी किती चांगल्या शिक्षिका होत्या, हे लक्षात येते.

आजी मराठी विषयातून पदवीधर झाल्या. `भूगोल’ विषयातून त्यांनी शिक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. ठाणे येथील महाराष्ट्र विद्यालयात त्या रूजू झाल्या. पुढे नोकरी सांभाळून त्यांनी शिक्षक पदवी प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यांच्यावर भूगोलाबरोबरच इतिहास शिकवण्याचीही वेळ आली. वास्तविक पाहता, या दोन्ही विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक असतात, परंतु आजी हे दोन्ही विषय नीट शिकवू शकतील अशी मुख्याध्यापकांना खात्री होती. तशी सूचना मिळाल्यावर आजींनी मे महिन्याच्या सुटीत विषयाची पूर्वतयारी केली आणि शाळा सुरू झाल्यावर नववी-दहावीच्या वर्गांना इतिहास-भूगोल शिकवायला सुरुवात केली. त्या अनुभवाबद्दल विचारले असता आजी सांगतात, `विद्यार्थ्याला कळेपर्यंत आवाजात राग डोकावू न देता मन लावून शिकवणे, यासाठी शिक्षकांकडे संयम असावा लागतो. तो माझ्याकडे होता. विद्यार्थी जीवाचा कान करून शिकायचे. भरघोस गुण मिळवायचे. विद्यार्थ्यांवर मी खूप प्रेम केले, तसेच त्यांनीही माझ्यावर केले. मी निवृत्त झाले, तेव्हा मागच्या बॅचचे विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यापैकी आज अनेक जण उच्चपदावर काम करत आहेत, तरीही ते अजून माझी आठवण ठेवून आहेत. गेल्याच वर्षी त्यांचा एक समूह मी ठाण्यात स्थलांतरित झाले आहे, हे कळल्यावर मला भेटण्यासाठी आला होता. त्यांना पाहून कृतकृत्य वाटले.’

आजींचे माहेर सधन होते, तर सासर गरीब. परंतु, यजमानांचे कर्तृत्व पाहून लग्न लावून दिले. आजोबा महाविद्यालयात प्रोपेâसर होते. त्यांनीच आजींना शिक्षक होण्यासाठी प्रोत्साहन दिले. आजी शिक्षिका झाल्या. मुलांना शिकवता शिकवता त्यांच्यातील लेखिका आणि कवयित्रीदेखील जागी झाली. त्यांचे साहित्य `खांदेश वैभव’, `माहेर’, `वाङमय शोभा’ इत्यादी साप्ताहिक, मासिकांतून प्रकाशित झाले. अजूनही त्यांचे लेखन, काव्य सुरू असते. सुचलेले, वाचलेले, ऐकलेले सुविचार, कथा, कविता त्या आपल्या डायरीत सुवाच्यक्षरात नोंदवून ठेवतात.

आजींच्या घरात संघाचे वातावरण होते. त्यामुळे बालपणापासूनच त्यांनाही घरच्यांसारखी समाजकार्यात सहभागी होण्याची आवड आहे. त्या पाककलेतही निपुण आहेत. खाणे आणि खाऊ घालणे, याची त्यांना आवड आहे. या त्यांच्या आवडीला वेळोवेळी पोषक वातावरण मिळत गेले. आजही त्यांचा मुलगा, सून, नातवंडे आपापल्या परीने समाजकार्यात गुंतले आहेत. तसे करण्याची प्रेरणा त्यांना आजींकडून मिळाली असणार, हे निश्चित!

अशाप्रकारे ताम्हनकर  आजींनी केवळ `लोकरीची’ नाही, तर `लोकांची’ही गुंफण केली. त्यांच्या कामाची आणि मायेची ऊब गरजवंतांना मिळत राहो आणि हे उबदार हात असेच निरोगी, दीर्घायुष्यी राहोत, ही सदिच्छा! आजींप्रमाणे आपणही त्यांच्यासारखा समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला, तर समाजकार्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळू शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या