श्रावण विशेष : चविष्ट शाकाहार


>>शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ

श्रावण म्हणजे हिरवाईऋतुनुसार आहार हे आपल्या आहारपद्धतीचे मूळ तत्त्व. हिरवाईमुळे, व्रतवैकल्यांमुळे एकंदरीतच सात्त्विकता वातावरणात भरून राहिलेली. बऱयाच घरांतून ऋतुमानानुसार शाकाहारच अवलंबला जातो. पाहूया हा शाकाहार चविष्ट कसा करायचा

श्रावण येताच प्रत्येकाकडेच सणांच्या आगमनाची तयारी उत्साहाने सुरू होते. अनेकजण विविध कारणाने उपवास करतात तर बरेचजण शाकाहारी आहाराचे पालन करतात. बहुतांश लोकांकडे या महिन्यापासून काही काळ मांसाहार वर्ज्य होतो. यामुळे आहारात संपूर्ण शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो. पण अनेकांना त्यामुळे आता जेवणात नक्की काय खायचे असा प्रश्न पडतो.

शाकाहारी जेवण चविष्ट केले त्याचबरोबर झणझणीत पदार्थाची निवड केली आणि जेवणात विविध शाकाहारी पदार्थांचा समावेश केला तर या काळात शाकाहारी जेवणाचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर मांसाहारी पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. म्हणूनच शाकाहार स्वीकारताना योग्य प्रमाणात प्रथिने शरीराला उपलब्ध करणे गरजेचे असते. म्हणूनच शाकाहारी पदार्थ करताना स्वयंपाकात विविध पदार्थ करावेत व त्यांचा आनंद घ्यावा. श्रावणात शाकाहारी पदार्थ चविष्ट, वेगळे व चटकदार असले तर मांसाहार नसला तरी जेवणात नावीन्य राहते व मांसाहारी पदार्थांची उणीव भासत नाही. यासाठी जेवणात कोणते पदार्थ खावेत याबाबत काही टिप्स.

पावसाळी भाज्या

या दिवसात मंडईत मिळणाऱया वेगवेगळ्या भाज्या आरोग्यदायी असतात व त्यांचा समावेश आवर्जून आहारात करणे आवश्यक आहे. करटोली, रानभाज्या, अळू, तोंडली, दुधी, पडवळसारख्या भाज्यांचा समावेश करावा व या काळात अशा ताज्या भाज्यांचा स्वाद घ्यावा. या भाज्यांमध्ये अनेकआवश्यक जीवनसत्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ असल्याने आरोग्यदायी असतात.

पनीर, मशरूम व सोया यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा. हे पदार्थाचे केलेले प्रकार चविष्ट, पौष्टिक व मांसाहारी पदार्थांसारखेच लागतात. त्यामुळे शाकाहारी जेवणात विविध प्रकारांचा समावेश होतो व मांसाहारी पदार्थाची उणीव भासत नाही.

पोळी भाजीचा बेत न करता सोपा पण चविष्ट असा बटाटय़ाचे पराठे किंवा पनीर किंवा मिश्र भाज्यांचे पराठे करून जेवणात वेगळेपणा येतो.

कडधान्ये

आहारात कडधान्यांचा समावेश केल्याने आहारात प्रथिनेचे प्रमाण योग्य राहते. विविध कडधान्यांच्या उसळी चविष्ट व पौष्टिक असतात. त्याचबरोबर कांदा-खोबऱयाचे किंवा खोबरे सुक्या मिरची व धन्याचे वाटप केले तर मांसाहारी पदार्थप्रमाणेच उसळींची चव लागते. उसळी जेवणात पोळी भाताबरोबर खाव्यात किंवा उसळ व त्यात पोहे, कांदा, बटाटा व चटण्या घालून चवदार झणझणीत मिसळ करावी. या काळात मूग, मटकी, मसूर, चवळी, काळा वाटाणा या कडधान्यांच्या उसळी करून जेवणाचा आनंद घ्यावा.

भाताचे प्रकार

मसाले भात, खिचडी, पुलाव, तोंडली भात, बिर्याणी केल्याने विविध भाज्यांचा समावेश होतो व एक चविष्ट व वेगळा पदार्थ खाल्याचा आनंद मिळतो. या सोबत दही, लोणची व पापड यांचा समावेश केला तर उत्तम.

भाजणीचे थालीपीठ किंवा भाजणीचे वडे सर्वांनाच आवडीचे असतात. चवदार, खुसखुशीत व खमंग वडे खाऊन नक्कीच समाधान वाटते. भाजणी चविष्ट व पौष्टिक असल्याने त्याचा आहारात समावेश आवर्जून करावा.

काप

तोंडी लावायला कच्च्या केळ्याचे, सुरणाचे किंवा कंदाचे काप जेवणाची चव वाढवतात. आरोग्यदायी व चविष्ट असल्याने त्यांचा समावेश जेवणात करावा. गरम गरम व कुरकुरीत काप मधल्या वेळेतही खायला उत्तम.

पारंपरिक पदार्थांऐवजी इतर सोपे व चविष्ट पदार्थांचा समावेश करावा. जसे दही वडे, पाव भाजी, पिझ्झा, मिश्र भाज्यांची फ्रँकी हे पदार्थ घरी केल्याने ते पावसाळ्यात खायला योग्य ठरतात व आरोग्याला ही धोका नसतो.

अशा विविध शाकाहारी पदार्थांचा समावेश आहारात केल्याने जेवणात वेगळेपणा येतो. पावसाळ्यात उत्साहाच्या वातावरणात चटपटीत, झणझणीत व चविष्ट पदार्थांचा आनंद घेण्याची मजाच वेगळी असते.