आयपीएलमध्ये शेन वॉर्नचे कमबॅक

सामना ऑनलाइन। नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रमी फिरकी गोलंदाज आणि आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेन वॉर्नने कमबॅक केलं आहे. तब्बल १० वर्ष आयपीएलपासून दूर राहिलेला वॉर्न पुन्हा एकदा पुनरागमन करत असल्यानं प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. मात्र यावेळी वॉर्न खेळाडू म्हणून नाही तर राजस्थान रॉयल्स संघाचा मेंटर म्हणून कमबॅक करत आहे. वॉर्न कर्णधार असताना राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलचा चषक जिंकला होता.

आयपीएलमध्ये कमबॅक केल्यानंतर शेन वॉर्नचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, राजस्थान रॉयल्स संघामध्ये कमबॅक केल्यानंतर मला प्रचंड आनंद होत असून नव्या भूमिकेसाठी मी उत्साहीत आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे विशेष स्थान असल्याचंही वॉर्न म्हणाला. आयपीएल-२०१८च्या राजस्थान संघाबाबत बोलताना वॉर्न म्हणाला की, आमच्याकडे तरुण आणि उत्साही खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उतावळा आहे.

वॉर्नच्या कमबॅकबाबत संघ मालक मनोज बदाले यांनीही आनंद व्यक्त केला आहे. क्रिकेट या खेळाचा शेन वॉर्न गुरू असून त्याच्या उपस्थितीचा संघाला फायदा होईल असे ते म्हणाले. वॉर्नने आयपीएलमध्ये २००८ ते २०११ पर्यंत राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. यादरम्यान त्याने गोलंदाजीत ५२ सामन्यात प्रतिनिधित्व करताना ५६ बळी मिळवले होते.