शांतनु महेश्वरी याने जिंकला खतरों के खिलाडी-८चा किताब

सामना ऑनलाईन | मुंबई

डान्सर आणि अॅक्टर असलेला शांतनु महेश्वरी याने रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी-८ च्या विजेत्याचा मान पटकावला आहे. शांतनुने फायनलमध्ये जबरदस्त स्टंट करत अभिनेता रवी दुबे आणि अभिनेत्री हिना खान यांना मागे टाकत KKK-८ ची ट्रॉफी पटकावली आहे. शेवटची लढत शांतनु महेश्वरी आणि हिना खान यांच्यात झाली होती. शांतनुला बक्षीस रुपात २० लाख रुपये आणि एक कॅम्पस गाडी मिळाली आहे. खतरो के खिलाडी शोच्या ग्रॅंड फिनालेमध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ सिनेमाची स्टारकास्ट अजय देवगण, श्रेयस तळपदे, अरशद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि तब्बू यांनी हजेरी लावली होती.

शांतनुने आपल्या समजदारीने अतिशय उत्तम स्टंट केले आहेत. फक्त एकदाच तो एलिमिनेशन राउंडमधून बाहेर गेला होता. मानसिक ताकदीच्या जोरावर, उत्तम सेंस वापरून सगळेच स्टंट धमाकेदार सादर केले. शोमधील सर्वच खेळाडू शांतनुला आपला तगडा प्रतिस्पर्धी मानत होते. जिंकल्याचा आनंद व्यक्त करत शांतनुने ‘मला अजिबात आशा नव्हती की मी जिंकेन. मला वाटलंच नव्हत की मी फायनलपर्यंत पोहचेन. या प्रवासात मी माझ्या भितीवर मात केली आहे. शोमध्ये निया शर्मा, मोनिका डोगरा, रवि दुबे, रित्विक यांच्यासोबत माझी तगडी स्पर्धा होती’, या शब्दांत आपले मनोगत मांडले आहे.

शांतनु महेश्वरी डांसर-कोरियोग्राफर आहे. त्याने डांस शो आणि सीरियल मध्येही काम केले आहे. खतरों के खिलाडी-८ ला जबरदस्त टीआरपी मिळाला आहे. जेव्हा हा शो प्रदर्शित झाला तेव्हापासूनच टीपीआर चार्टच्या टॉप-५ मध्ये या शोची गणना करण्यात आली होती. यावेळी शोमध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वोत्तम खिलाडी सामिल झाले होते. खतरों के खिलाडी-८ या सीझनची सुरुवात जुलैमध्ये झाली असून शूटिंग स्पेनमध्ये झाले होते.