माझी प्रिया : शंतनु मोघे-प्रिया मराठे

शंतनु आणि प्रिया. कश्मीरचे निसर्ग सौंदर्य, बर्फवृष्टी यात खऱ्या अर्थाने मधुचंद्र फुलला.

मधुचंद्र म्हणजे – लग्नाच्या धावपळीनंतरचा श्रमपरिहार आणि संसारिक जबाबदाऱया उचलण्याआधीची एकमेकांमधील गरजेची असलेली सुसुत्रता.
फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – आम्ही अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून पुण्यात छोटेखानी लग्न केले. त्यादरम्यान आमच्या दोघांचेही डेली सोप असल्यामुळे आम्ही एक दिवसासाठी लोणावळय़ाला गेलो होतो, पण खरे हनीमूनला वर्षभराने गेलो ते कश्मीरला.
आवडलेले ठिकाण? – कश्मीरमध्ये आम्हाला सोनमर्ग, पेहलगाम ही दोन ठिकाणं फार आवडली होती.
ठिकाणाचे वर्णन – जन्नत. स्वर्ग पृथ्वीवर अवतरल्याचा भास होत होता. निसर्गाची मुक्त उधळण इथे याची देही याची डोळा पाहायला मिळाली.
तिथे केलेली शॉपिंग – तिथे खूप शॉपिंग केली होती. अक्रोड भरपूर घेतले होते. कश्मिरी काम असलेल्या बेडशीट, वॉलहँगिंग घेतले होते. वॉलहँगिग आजही आमच्या हॉलमध्ये आहे.
काही खास क्षण – आम्ही सोनमर्गला जात असताना हिरव्यागार निसर्गाचे विहंगम दृष्य मनाला मोहरुन टाकत होतं. रस्त्याच्या दुतर्फा सगळीकडे हिरवळ, उंच-उंच डोंगर हे चित्र डोळ्यात साठवून घेत आम्ही सोनमर्गला गेलो आणि अचानक वातावरणात बदल होऊन बर्फवृष्टी होऊ लागली. मी आणि प्रिया आयुष्यात पहिल्यांदा बर्फवृष्टीचा आनंद घेत होतो. तिथून जेव्हा निघालो तेव्हा एखाद्या जादूप्रमाणे निसर्गाचे रूपडेच बदलले होते. सगळीकडे काही तासांपूर्वी दिसणाऱ्या हिरव्यागार निसर्गावर पांढऱया शुभ्र बर्फाने चादर पांघरली होते. ते सौंदर्य मनाला अलगद स्पर्शुन गेलं. अशा वातावरणात आपल्या प्रियकराच्या हातात हात घालून फिरणे तो क्षण सुखावणाराच असतो.
मधुचंद्र हवाच की…- हवाच… किमान ठरवून विवाह झालेल्या जोडप्यांसाठी तर हवाच. आपण मध्यम वर्गीय असल्याने आपल्याला शक्यतो एकांतात वेळ देता येत नाही. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी समजून घेण्यासाठी घरच्यांपासून दूर जाऊन मोकळीक मिळवण्यासाठी मधुचंद्र हवाच.
एकमेकांशी नव्याने ओळख – नव्याने ओळख अशी काही नाही. आम्ही लग्नाआधी बरीच वर्षे एकमेकांना भेटत होतो. आमची चांगली मैत्री होती, त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आजही ती मैत्रीण आधी नंतर बायको आहे.
किती दिवस द्यावेत… – तुम्हाला जितके दिवस शक्य तितके दिवस द्यावेत. पैसे आणि वेळ असेल तर तुम्ही कितीही दिवस घालवू शकता.
तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – रोगन जोश, यखनी पुलाव, ऱिहस्ता
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिजम – दोन्ही आवडेल. आपल्या जोडीदारासोबत अनोळखी ठिकाणी रोमॅन्टिजम आवडणारच.
जोडीदाराची खास आठवण? – सोनमर्गला गेलो तेव्हा अचानक झालेल्या बर्फवृष्टीचा आम्ही दोघांनीही मनमुराद आनंद घेतला. अगदी दोघंही लहान होऊन एकमेकांवर बर्फ फेकून खेळत होतो. बराच वेळ खेळल्यानंतर प्रियाला खूप थंडी वाजायला लागली. सुरुवातीला मला गंमत वाटली पण.ती इतकी गारठली होती की तिच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. त्यावेळी बोलती बंद होणे काय असते याचा प्रत्यक्षात अनुभव आला.
एकमेकांसाठी घेतलेली भेटवस्तू – तिथे प्रियाने मला लेदरचं जॅकेट घेतलं होतं आणि मी तिच्यासाठी पश्मिना शाल घेतली होती.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – बायको म्हणून ती खूपच ग्रेट आहे. आयुष्यात सगळय़ा गोष्टींबाबत ती फोकस्ड आहे. तिला नेमकं काय करायचं आहे हे तिला चांगले माहीत असल्याने ती अजिबात कन्फ्युज नसते. तिचं नियोजनही उत्तम असल्याने वेळेत सगळय़ा गोष्टी होतात. त्याचबरोबर कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याची कला तिच्यात आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही ती माझ्या आई-बाबांसोबत संवाद साधून वेळ देत असते. तिच्या मोकळय़ा स्वभावामुळे माझे आई-बाबा माझ्यापेक्षा तिच्याशी जास्त जव़ळ आहेत. ती त्यांची सून नसून मुलगीच आहे. एवढे तिने सगळय़ांशीच आपुलकीचे नाते बनवले आहे.