शरद कळसकरने दाभोलकरांना दोन गोळय़ा मारल्या! सीबीआयचा दावा

सामना ऑनलाईन, पुणे

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर याने दोन गोळ्या झाडल्या असून, कळसकर हा शस्त्र हाताळण्यात तरबेज असून, बॉम्ब तयार करण्यात पारंगत असल्याचा दावाही सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. ए. सय्यद यांनी त्याला 10 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकरला शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला पोलिसांविरोधात काय तक्रार आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने पोलिसांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी अटकेत असलेला शरद कळसकरचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रकरणात संबंध असल्याचा आरोप असल्यामुळे मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याचा ताबा सीबीआयकडे सोपविल्यानंतर मंगळवारी त्याला येथील शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

सीबीआयचे सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी यासंदर्भात युक्तिवाद केला. कळसकर हा शस्त्रांची हाताळणी आणि बॉम्ब बनविण्यात तरबेज आहे. त्याने  डॉ. दाभोलकर यांच्याकर दोन गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणातील अटक केलेल्या राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर, शरद कळसकर यांना समोरासमोर आणून चौकशी करायची आहे. शरद कळसकरला गुह्यात आणखी कोणी मदत केली? याचा तपास करायचा आहे. गुह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकी आणि पिस्तुलासंबंधीही चौकशी करायची आहे. त्यामुळे कळसकरकडे तपास करण्यासाठी त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात याकी, अशी मागणी अॅड. ढाकणे यांनी केली.

बचाव पक्षाचे ककील धर्मराज चंडेल यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. याप्रकरणी सीबीआयने अटक केलेला सचिन अंदुरे याची 14 दिवस सीबीआय कोठडी घेऊनही गुह्यात वापरलेले शस्त्र अथवा मोटारसायकल जप्त करण्यात आलेली नाही. अंदुरे याला घटनास्थळावर नेऊन नवीन थिअरी मांडण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे. मात्र, सीबीआयने ऑगस्ट 2016 मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून डॉ. दाभोलकर यांची हत्या सांरग अकोलकर आणि विनय पवार यांनी केल्याचे नमूद केले असून, अंदुरे, कळसकर यांना विनाकारण गोवले जात असल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी करावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून कळसकरला पोलीस कोठडी सुनावली.