२९ डिसेंबरला शरद पवार उरणमध्ये

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार २९ डिसेंबर २०१७ रोजी उरणमध्ये येत असून उरण नगरपरिषदेच्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळेच्या मैदानात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार सुनिल तटकरे यांनी दिली.

या मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष मनोज भगत, महिला अध्यक्षा भावना घाणेकर यांच्यासह उरणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष नियोजन करीत आहेत. तर उरण मधील मेळाव्यात तालुक्यातील विविध समस्यांवर शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने तालुक्यात आणखी तीन बंदरे कार्यान्वित आहेत. शिवाय सिंगापूर पोर्ट नावाने आकारात येत असलेले चौथे बंदर कार्यान्वित होत आहे. या चौथ्या बंदरात येथील प्रकल्पग्रस्तांवर या प्रशासनाकडून अन्याय करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उभी करण्यात आलेली गोदामे बंद पडून प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार या मेळाव्यात काय बोलतात याकडे तालुक्यातील लोकांचे लक्ष लागले आहे